कॅन्सर पेशंट साठी दाणाबंदर येथे दुमजली निवासी इमारतीचे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते उदघाटन



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

मुंबई दि. 2 -  मुंबईत परराज्यातून तसेच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून अनेक लोक कॅन्सर आणि इतर  गंभीर  आजारावर उपचार घेण्यासाठी मुंबईत येतात. त्या रुग्णांना आणि त्यांच्या श्रुश्रुषा करणाऱ्या नातेवाईकांना मुंबईत राहण्याची सुविधा उपलब्ध होत नसल्याने अनेक रुग्णांना रस्त्यावर राहावे लागत आहे.ही समस्या काही प्रमाणात दूर करण्यासाठी मुंबईत दाणा बंदर येथे राज फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ईश्वरी सेवा सदन या दुमजली इमारतीत 14 खोल्यांची विनामूल्य  निवास आणि भोजन व्यवस्था रुग्णांसाठी आणि त्यांची देखभाल करणाऱ्या नातेवाईकांना सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या इमारतीचे उदघाटन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केले. यावेळी राज फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष राजकुमार गुप्ता; वंदना गुप्ता; पत्रकार शिशिर सोनी; राम कुमार गुप्ता; कमलेश शेठ; महेश खर्द; शरद गुप्ता रिपाइं चे जिल्हा अध्यक्ष संजय पवार; विशाल दिवर;विशाल गायकवाड ; सचिन आठवले; अकबर शेख आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

 कॅन्सर आणि इतर गंभीर आजाराच्या रुग्णांसाठी निवास व्यवस्था विनामूल्य मुंबईत करून देण्याचा राज फाउंडेशन चा  उपक्रम चांगला आहे. दुमजली इमारतीत 14 खोल्या रुग्णांसाठी उपलब्ध केल्या आहेत. या उपक्रमाला अधिक मोठे करण्यासाठी या संस्थेला भारत सरकार तर्फे मदत करण्याचा  प्रयत्न करू तसेच  खाजगी उद्योजकांकडून सीएसआर फंडा मार्फ़त मदत मिळवून देऊ असे आश्वासन ना रामदास आठवले यांनी केले. 

आपल्या भारत देशात आज ही असे लोक आहेत की दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता प्रयत्न करतात. कोरोना च्या काळात अनेक कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करीत आहेत. सेवाभाव मनाशी बाळगून राज फाउंडेशन रुग्णसेवा करीत आहे. या इमारतीच्या 14 खोल्या रुग्णांना विनामूल्य देऊन भोजन ही विनामूल्य देण्यात येणार आहे. ही मानवसेवा  आदर्श असल्याचे ना रामदास आठवले म्हणाले. 



            

Post a Comment

Previous Post Next Post