प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई महानगरपालिका राज्य सरकार आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रमसाफल्य आवास योजनेंतर्गत मालकी हक्कांची घरे न देता आश्रय योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱयांना सेवा निवासस्थाने देत आहे. मात्र, ही योजना कामगार विरोधी आहे, सफाई कामगारांचे हक्क डावलणारी आहे. त्यामुळे ती रद्द करावी, नाहीतर आंदोलन करू, असा इशारा सफाई कामगार मालकी घर समितीने दिला आहे.
मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेविरोधात समितीची आज बैठक झाली. मुंबई महापालिकेमध्ये सफाई कामगारविरोधी आश्रय योजना अमलात आणण्याविरोधी मुंबई महानगरपालिकेतील कार्यरत 39 सफाई कामगारांच्या वसाहतीत तसेच इतर 30 हजार कामगारांमध्ये नाराजी आहे. ही योजना अमलात आणली तर मुंबई मनपाच्या आयुक्तांसह इतर संबंधित अधिकाऱयांविरुद्ध अॅट्रॉसिटी अॅक्टअंतर्गत तसेच शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करून योजनेविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेही समितीने स्पष्ट केले.या योजनेला विरोध म्हणून 10 ऑगस्टला आर्थर रोड येथील सफाई कामगार वसाहतीत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. बैठकीला भरत सोळंकी, गोविंदभाई परमार, प्रवीण पडाया, बाबुभाई सुमरा, नवीनचंद्र मकवाना, विक्रांत वालकर, रोहित लादे, वल्लभभाई मारू, जीवराजभाई राठोड, जयसिंहभाई सोलंकी, नरेश मकवाना, चंद्रकांत सोलंकी, खोडाभाई सोलंकी, हंसाबेन रावदका, लीलाबेन कातरिया, भरत सोलंकी आदी उपस्थित होते..