प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मलकापूर ता.२३, ज्येष्ठ विचारवंत नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील म्हणजे स्वातंत्र्यानंतर गेली सात दशके महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी नाळ जोडून जनआंदोलनांचे नेतृत्व करणारे बुलंद नेते आहेत. राजकारणाला व समाजकारणाला शेतकरी,कष्टकरी,पिचलेल्या सर्वहारा वर्गाच्या बाजूने नेत त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आयुष्य खर्च करणारे एन.डी.सर म्हणजे उक्ती व कृतीत एकवाक्यता जपणारे दुर्मिळ नेते आहेत.त्यांच्या या वाटचालीत त्यांच्या पत्नी सरोजताई पाटील ( माई ) यांचेही योगदान मोठे आहे,असे मत मलकापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रा. डॉ. एन. डी. पाटील महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अग्रणी महाविद्यालय योजना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित " प्रा.डॉ. एन. डी. पाटील साहेब यांची जनआंदोलने" या विषयावरील वेब कार्यशाळेत व्यक्त करण्यात आले. या कार्यशाळेत ज्येष्ठ इतिहासतज्ञ व विचारवंत प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील आणि समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी हे प्रमुख वक्ते होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुनील हेळकर होते.
या कार्यशाळेत ' प्रा.डॉ.एन. डी. पाटील यांचे शैक्षणिक कार्य ' या विषयावर बोलताना प्राचार्य डॉ.टी. एस.पाटील म्हणाले, कर्मवीर भाऊराव अण्णांचे कार्य पुढे नेण्याचा कृतिशील वसा आणि वारसा एन.डी.सरांनी जपला आहे. त्याआधारे रयत शिक्षण संस्थेच्या सर्वांगीण विकासात अतिशय मौलिक स्वरूपाचे योगदान त्यांनी दिले. 'शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी?' हा मुद्दा त्यांनी नेहमीच अग्रक्रमाने मांडला आहे. शिक्षणाच्या श्वेतपत्रिकेला शिक्षणाची कृष्णपत्रिका असे संबोधत त्याची चिरफाड त्यांनी केली.शिक्षणाची कवाडे समाजातल्या शेवटच्या माणसालाही खुली झाली पाहिजेत ही भूमिका ते सातत्याने मांडतात.एन.डी. सरांनी नव्या शैक्षणिक धोरणाबाबत 'अभिजनांना सर्व काही आणि बहुजनांना ठेंगा' ही मांडलेली भूमिका अनेक अर्थाने आज महत्त्वाची आहे. त्यांच्या शैक्षणिक विचारांवर आधारित वाटचाल केली तरच खऱ्या अर्थाने सुदृढ समाज निर्मिती होणार आहे.
कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी ' प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे समाजकारण ' या विषयावर बोलताना म्हणाले की, समाजकारण आणि एन.डी. हे समानार्थी शब्द आहेत. एन.डी. सरांच्या समाजकारणाला व राजकारणाला समाजातील शेवटच्या माणसाच्या विकासाचा विचार आणि शास्त्रीय समाजवादाची मूलभूत बैठक यांचा आधार आहे. सामाजिक सत्याप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेमुळे महाराष्ट्राच्याच नव्हे भारताच्या समाजकारणाच्या इतिहासात एन.डी.पाटील यांच्या नेतृत्वाला मोठे नैतिक अधिष्ठान आहे. ज्या लढ्यात सर उतरतात तो लढा यशस्वी होतो हा महाराष्ट्राचा इतिहास व वर्तमान आहे. एन.डी.सरांनी शेतकरी चळवळ, सेझ विरोधी चळवळ, कापूस एकाधिकार योजना, सीमालढा ,टोलविरोधी लढा ,वीज दरवाढीविरुद्ध आंदोलने,जागतिकीकरण विरोधी लढा असे असंख्य लढे लढले व यशस्वी केले.तेवीस वर्षाची आमदारकी आणि मंत्रिपदही त्यांनी समाजकारणासाठीच वापरले. महाराष्ट्राच्या स्थापनेपासून ते आजतागायतचे एक सर्वोच्च समाजकारणी म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पहावे लागते. या वेबिनार मध्ये दोन्ही वक्त्यांनी आपल्या विषयाची सखोल मांडणी केली.त्यातून प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या कार्य कर्तृत्वावर व्यापक प्रकाश टाकला.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.सुनील हेळकर म्हणाले की, प्रा. डॉ. एन.डी पाटील यांनी शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात मूलभूत कार्य केले आहे.जात पात धर्म हे विसरून समाजकारण त्यांनी केले. उक्ती आणि कृतीत अंतर न ठेवणारे आकाशाच्या उंचीचे व्यक्तिमत्व त्यांचे आहे.न मळलेली वाटेवरच्या त्यांच्या प्रवासाने हजारो कुटुंबे व लाखो लोकांना न्याय दिला आहे,देत आहेत.
या ऑनलाइन कार्यक्रमाला एन. डी. पाटील यांच्या पत्नी सौ. सरोज पाटील (माई) व एम. बी. शेख साहेब यांच्यासह अनेक मान्यवर सहभागी होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक, स्वागत व प्रमुख पाहुण्यांचा परिचय कार्यशाळेचे समन्वयक प्रा. एन. एम. पाटील यांनी करून दिला. तर आभार डॉ.एन. के. कांबळे यांनी मानले. तसेच सूत्रसंचालन प्रा.प्रमोद नाईक यांनी केले. यावेळी विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.