प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मुंबई : ऑनलाईन पद्धतीने रेमडेसिव्हीर इंजेक्शन उपलब्ध करुन देतो अशी बतावणी करुन लाखोंचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई पोलिसांनी भंडाफोड केला आहे. या रॅकेटचे धागेदोर थेट बिहारपर्यंत जुळले आहेत. 16 जून रोजी एका व्यक्तीने ऑनलईन पद्धतीने रेमडेसिव्हीर इंजेक्शन मागवले होते. पण त्याला हे इंजेक्शन वेळेवर मिळाचे नाही. ऑनलाईन पद्धतीने पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे या व्यक्तीने मुंबई पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याच तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत पोलिसांनी या रॅकेटचा भंडाफोड केला. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 60 लाख रुपये आणि 100 सीमकार्ड जप्त केले आहेत.तसेच एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तक्रारीच्या अनुषंगाने तपासाला सुरुवात
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला. यामुळे आपल्या रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी लोक जमेल त्या मार्गाने रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवण्याचा प्रयत्न करत होते. अशा काळात सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून रेमडेसीव्हीर इंजेक्शनच्या ऑर्डसाठी संपर्क करा, असे मेसेजेस फिरत होते. याच मेसेजच्या जाळ्यात फसून एका व्यक्तीने रेमडेसिव्हीर इंजेक्शनसाठी ऑनालईन पद्धतीने ऑर्डर दिली. तसेच त्यासाठी ऑनलाईन पद्धतीनेच पैसेसुद्धा दिले. मात्र, पैसे देऊनही इंजेक्शन न मिळाल्यामुळे त्या व्यक्तीने 16 जून रोजी पोलिसात रितसर तक्रार केली. हा प्रकार समोर आल्यानंतर अशा अनेक लोकांची फसवणूक झाल्याचा संशय़ पोलिसांना आला. म्हणूनच पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत होते.
फसवणुकीसाठी प्रॉपर कॉल सेंटर
या प्रकरणातील आरोपींना ट्रेस करणं कठीण होतं. पण तरीही तांत्रिक बाबींच्या आधारे मुंबई सायबर पोलिसांची टीम थेट बिहारला पोहोचली. तिथे पोहोचल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने फसवेगिरी करण्यासाठी एक प्रॉपर कॉल सेंटर चालवलं जात असल्याचं पोलिसांना समजलं. त्यानंतर पोलिसांनी या कॉल सेंटरवर धाड टाकून 6 जणांना अटक केली.
अटक करण्यात आलेले आरोपी सुशिक्षित
मिळालेल्या माहितीनुसार या रॅकेटमध्ये पकडण्यात आलेले आरोपी हे सुशिक्षित आहेत. बी टेक, बीएस्सी आणि 12 वी सायन्स असे शिक्षण घेतलेले यातील काही आरोपी आहेत. यामध्ये एका अल्पवयीन आरोपीचाही समावेश आहे. या आरोपींनी याआधी बजाज फायनान्सचं कर्ज मिळवून देतो असे सांगूनही अनेकांची फसवणूक केल्याचं समोर आलंय.
तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने लोकांना लुबाडण्याची तयारी
या आरोपींनी कोरोनाचे जेवढे व्हेरिएन्ट्स आहेत त्यानुसार लागणारी औषधे आणि त्यांची माहिती मिळवून ठेवली होती. याच माहितीच्या आधारे हे आरोपी नागरिकांची फसवणूक करायचे. हे लोक तिसऱ्या लाटेत लहान मुलांना धोका असल्याने त्या अनुषंगानेसुद्धा फसवणुकीची तयारी करत होते. या आरोपींकडून आतापर्यंत 60 लाख रुपये जप्त केले असून 100 हून अधिक सिमकार्ड्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आलीय. आणखी काही आरोपी अटक होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, लोकांनी जागरूकतेने ऑनलाईन व्यवहार करावेत. बऱ्याचशा गोष्टी ऑनलाईन मिळत नाहीत. त्या प्रत्यक्षात खरेदी करणं उत्तम असतं. नागरिकांनी काळजी घ्यावी असे पोलिसांनी आवाहन केले आहे.