प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोकणावर गुरुवारी अक्षरशः आभाळ फाटले. मुसळधार पावसाने हाहाकार उडाला. बुधवारी सायंकाळपासून होत असलेल्या पावसामुळे रायगड, रत्नागिरीतील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. धरणांतून होणारा पाण्याचा विसर्ग आणि समुद्राला आलेले उधाण यांनी त्यात भर घातली. पुराचे पाणी सर्वत्र पसरले. जगबुडी नदीला आलेल्या महापुराच्या पाण्याने चिपळूण शहराला चारी बाजूंनी वेढले. घरे, दुकाने, बाजारपेठा पाण्याखाली गेल्या. पाच ते आठ फूट पाण्याचा प्रवाह वेगाने वाहू लागल्याने शेकडो गाडय़ा वाहून गेल्या. हजारो नागरिक पुराच्या पाण्यात अडकले. घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी सुरक्षेसाठी छतांवर धाव घेतली. एनडीआरएफच्या पथकांनी मदतकार्य हाती घेतले असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.लष्कराची पथके तसेच हेलिकॉप्टरही तैनात ठेवण्यात आली आहेत. पावसामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली, पण त्याचबरोबर कोकण रेल्वेही लुडकली. मार्गावर अडकलेल्या सहा हजार प्रवाशांची सुखरूप सुटका करण्यात आली. पावसाने आज राज्यालाच तडाखा दिला. पुराचे पाणी रेल्वे रूळ आणि महामार्गांवर आल्याने कोकण रेल्वेबरोबरच मुंबई-गोवा महामार्ग ठप्प झाला आहे. परिणामी पूरग्रस्त भागांमध्ये मदत पोहोचवण्यात अडचणी येत आहेत.
युद्धपातळीवर मदतकार्य करा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला आदेश
अतिवृष्टीमुळे विशेषतः रत्नागिरी, रायगड जिह्यांत निर्माण झालेल्या पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक बोलावली. परिस्थितीचा आढावा घेतानाच मुसळधार पाऊस आणि यामुळे नद्यांच्या पातळीत वाढ होत असल्याने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी अलर्ट राहावे. त्याचप्रमाणे या भागातील नागरिकांनी खबरदारी बाळगतानाच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. हवामान विभागाने तीन दिवस कोकण किनारपट्टी भागात दिलेल्या पावसाचा इशारा आणि जारी केलेला रेड आणि ऑरेंज अलर्ट या पार्श्वभूमीवर यंत्रणांनी तत्काळ उपाययोजना कराव्यात, युद्धपातळीवर मदतकार्य करावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनाला दिले.
या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सर्व यंत्रणांनी पुढील इशारा लक्षात घेऊन सावधपणे व काळजीपूर्वक काम करावे. कोविड रुग्ण असतील त्या ठिकाणी पर्यायी व्यवस्था करावी अशा सूचना दिल्या. यावेळी बैठकीत वाढलेल्या नद्यांच्या पातळीबाबत माहिती देण्यात आली. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी एनडीआरएफच्या तुकडय़ा, स्थानिक पोलीस व अग्निशमन दलाचे जवान, सागरी तटरक्षक जवान हे स्थानिक नागरिकांची मदत घेऊन काम करीत आहेत अशी माहिती दिली. या बैठकीस मुख्य सचिव सीताराम कुंटे, मदत व पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव लाभक्षेत्र अजय कोहिरकर, विजय गौतम, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, कोकण विभाग जलसंपदा मुख्य अभियंता तिरमणवार आदींची उपस्थिती होती. त्यांच्याकडून मुख्यमंत्री ठाकरे यांनी नद्यांची धोका पातळी, पाणी शिरलेली ठिकाणे तसेच नागरिकांच्या स्थितीबद्दल माहिती घेतली.
पंतप्रधानांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोकणातील पूरस्थितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून माहिती घेतली. केंद्र सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.