महाराष्ट्र पाऊस :चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटल मधील कोव्हिड सेंटरमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला



प्रेस मीडिया वृत्तसेवा :

कोकणात पावसानं धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरीतील चिपळूणमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं होतं. आता पाणी ओसरायला सुरुवात झाली असली तरी त्यात झालेलं नुकसान दिसू लागलंय.चिपळूणच्या अपरांत हॉस्पिटल मधील कोव्हिड सेंटरमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. चिपळूण नगरपालिकेच्या समोर हे अपरांत हॉस्पिटल आहे.

रत्नागिरी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चिपळूण शहराला जवळपास 30 तास पुराने विळखा घातल्यानंतर अपरांत हॉस्पिटल मध्ये सुद्धा पाणी शिरलं. तिथे 21 रुग्ण होते. त्यातील काही रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. मात्र, पुराचे पाणी भरताच हॉस्पिटलचा संपर्क तुटला होता."या पुरामुळे कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे गेल्या 24 तासात 57 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 24 तासात 57 जणांचा मृत्यू झाला. यात रायगड 47, सातारा 4, मुंबई उपनगर 4, सिंधुदुर्ग 2 जणांचा मृत्यू झाला.

राज्यात गेल्या 24 तासात 45 जण बेपत्ता आहेत. त्यात सातारा 4, रायगड 39 आणि ठाण्यातील 2 जणांचा समावेश आहे

राज्यात गेल्या 24 तासात रत्नागिरी 1200, सातारा मधून 27 तर ठाणे जिल्ह्यातून 2681 अशा एकूण 3908 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

कोल्हापूर, रायगड, सांगली, सातारा, रत्नागिरी, ठाणे,मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा मोठा फटका बसला.

तळये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील तळये गावात दरड कोसळून 36 जणांचा मृत्यू झाला आहे, तर पोलादपुरातील सुतारवाडी गावात दरड कोसळून 11 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तर जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येईल, असंही त्यांनी जाहीर केलं आहे.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण 10 ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले आहेत.या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली.

Post a Comment

Previous Post Next Post