अकरावी आणि आयटीआय प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी उत्सुक असल्याने प्रवेशासाठी मोठी शर्यत , मात्र यंदा अकरावी प्रवेशासाठीच्या शर्यतीला सीईटीचा ब्रेक लागणार


प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 दहावीच्या परीक्षेत मोठय़ा प्रमाणावर आणि टक्केवारीने विद्यार्थी पास झाल्याने अकरावी आणि आयटीआय प्रवेशासाठी मोठय़ा प्रमाणावर विद्यार्थी उत्सुक असल्याने प्रवेशासाठी मोठी शर्यत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र यंदा अकरावी प्रवेशासाठीच्या शर्यतीला सीईटीचा ब्रेक लागणार आहे. अकरावी प्रवेश हे सीईटीच्या आधारे करण्याचे शालेय शिक्षण विभागाने या आधीच जाहीर केले आहे.

सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशात प्राधान्य मिळणार असून सीईटीत पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांना उर्वरित रिक्त जागांवर दहावीतील गुणवत्तेनुसार अकरावी प्रवेश मिळणार आहे.यंदा मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून तब्बल 15 हजार 540 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण असून 90 ते 85 टक्क्यांमध्ये 21 हजार 992 आणि 80 ते 85 टक्क्यांदरम्यान 32 हजार 294 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांना सीईटीतदेखील उत्तम गुण मिळाल्यास अकरावी प्रवेशाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. एसएससीबरोबरच सीबीएसई आणि आयासीएसई बोर्डाचे विद्यार्थीही प्रवेशासाच्या शर्यतीत असून या विद्यार्थ्यांनाही सीईटीच्या आधारेच अकरावी प्रवेशासाठी पात्र ठरविले जाणार आहे.

दहावीच्या निकालानुसार, राज्यात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. मुंबईतल्या नामांकित महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशांची चुरस सर्वाधिक असते. या 100 टक्केवाल्या विद्यार्थ्यांपैकी मुंबईतील 32 विद्यार्थी आहेत. शाळास्तरावर पार पडलेल्या मूल्यमापनामुळे दहावीत विद्यार्थ्यांना भरघोस गुण मिळाल्याने पुढील प्रवेशात मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या तरी अकरावी प्रवेशात दहावीच्या प्रवेशाला सीईटीचा ब्रेक लागला असला तरी दहावीनंतर आयटीआय आणि इतर डिप्लोमा अभ्यासक्रमाकडे वळणाऱया विद्यार्थ्यांना शासकीय संस्थेत प्रवेशासाठी मोठय़ा स्पर्धेला सामोरे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

निकाल आला … विद्यार्थ्यांना नाही कळला… वेबसाईट हँग

दुपारी एक वाजता शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी निकालाची वेबसाईट खुली करण्यात आली; मात्र अवघ्या काही वेळातच वेबसाईट हँग झाली. संध्याकाळ उलटून गेली तरी विद्यार्थ्यांना गुण समजू शकले नाहीत. अखेर सहा-साडेसहाच्या सुमारास वेबसाईट पूर्ववत झाली. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने यंदा ऑनलाइन निकाल पाहण्यासाठी एमकेसीएलच्या दोन्ही वेबसाईट बाद केल्या आहेत. निकालासाठी यंदा result.mh-ssc.ac.in ही नवी लिंक देण्यात आली आहे. तसेच शिक्षण मंडळाच्या नेहमीच्या www.mahahsscsscboard.in या अधिकृत लिंकवरही निकाल पाहता येईल, असे शिक्षण मंडळाने स्पष्ट केले होते. मात्र दुपारी 1 वाजल्यापासून विद्यार्थी दोन्ही वेबसाईटवर निकाल सर्च करीत होते, मात्र त्यांना वेबसाईट रिस्पॉन्स देत नसल्याचाच मेसेज वारंवार दिसत होता. राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दिनकर पाटील यांनी सांगितले, एका खासगी वेबसाईट सर्व्हिस प्रोव्हायडरकडून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे वेबसाईट हँग झाली होती. मात्र निकाल जाहीर होऊन सात तास उलटून गेले तरी विद्यार्थ्यांना किती गुण मिळाले हेच समजू शकलेले नाही. दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी वेबसाईटवरील तांत्रिक बिघाडाच्या चौकशीचे आदेश संबंधितांना दिले आहेत.

टक्केवारीनुसार विद्यार्थी संख्या

90 टक्के, त्यापेक्षा जास्त 104633

85 ते 90 128174

80 ते 85 185542

75 ते 80 232442

70 ते 75 252444

65 ते 70 241057

60 ते 65 214712

45 ते 60 229314

45 पेक्षा कमी 61294

मुंबई विभागाचा श्रेणीनिहाय निकाल (विद्यार्थीनिहाय)

नोंदणी केलेले 3,47,683

मूल्यांकन झालेले 3,47,667

प्रावीण्यासह प्रथम श्रेणी 1,10,979

प्रथम श्रेणी 1,59,811

द्वितीय श्रेणी 72,917

उत्तीर्ण श्रेणी 3830

रिपीटर्सचा निकालही नव्वदीपार ; 4,922 जणांचा निकाल राखीव

अनेक वर्षे दहावीच्या परीक्षेची वारी करणाऱया रिपीटर्स विद्यार्थ्यांना यंदा कोरोना चांगलाच फळला आहे. अंतर्गत मूल्यमापनाआधारे जाहीर झालेला रिपीटर्स विद्यार्थ्यांचा दहावीचा निकाल यंदा प्रथमच नव्वदीपार गेला. राज्यभरातून 82 हजार 802 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 82 हजार 674 विद्यार्थ्यांची संपादणूक शिक्षण मंडळाकडे आली. यांपैकी 74 हजार 618 विद्यार्थी पास झाले असून निकालाची टक्केवारी 90.25 इतकी आहे. अंतर्गत मूल्यांकन झालेल्या रिपीटर्स विद्यार्थ्यांपैकी 8 हजार 56 विद्यार्थी नापास झाले असून यांपैकी 4 हजार 922 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्याची माहिती शिक्षण मंडळाने दिली. या विद्यार्थ्यांचे मागील इयत्तांचे निकाल अद्याप मिळालेले नाहीत. काही विद्यार्थ्यांनी यापूर्वी अनेकदा दहावीची परीक्षा दिल्याने त्यांचेदेखील एकापेक्षा जास्त निकाल आहेत. तसेच काही विद्यार्थ्यांचा डाटा उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचे निकाल मंडळाने राखीव ठेवले असून माहिती उपलब्ध झाल्यानंतर हे निकाल जाहीर केले जातील, असे शिक्षण मंडळाच्या वतीने सांगण्यात आले.

केंद्रीय मंडळांआधी एसएससीचा निकाल जाहीर

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाने सर्वात आधी दहावीची परीक्षा रद्द करून मूल्यमापन पद्धती जाहीर केली होती, मात्र अजूनही या केंद्रीय शिक्षण मंडळांना दहावीचा निकाल जाहीर करता आलेला नाही. एसएससी बोर्डाने मात्र कोरोनाच्या दुसऱया लाटेचा प्रभाव असताना मागील वर्षीपेक्षा 13 दिवस आधीच निकाल जाहीर केल्याने अकरावी प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या वर्षी कोरोनाच्या पहिल्या लाटेत 29 जुलै रोजी निकाल लावण्यात आला होता.

मुंबईसह पाच शिक्षण मंडळांचा निकाल 99.96 टक्के

मुंबईसह पुणे, संभाजीनगर, नाशिक, लातूर या विभागीय शिक्षण मंडळांचा निकाल 99.96 टक्के इतका लागला आहे. मागील अनेक वर्षांत निकालाच्या टक्केवारीत मागे राहिलेल्या विभागीय मंडळांना यंदा टक्केवारीचा मोठा टप्पा गाठता आला. मुंबई विभागीय शिक्षण मंडळातून यंदा 3 लाख 47 हजार 683 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यांपैकी 3 लाख 47 हजार 667 विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन शिक्षण मंडळाला मिळाले असून त्यातील 3 लाख 47 हजार 536 विद्यार्थी पास झाले आहेत.

दक्षिण मुंबईतून 34 हजार 602 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यातील 34 हजार 253 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, निकालाची टक्केवारी 98.99 इतकी आहे. मुंबई उपनगर-1 मधून 66 हजार 127 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यांपैकी 65 हजार 744 जण उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.42 इतकी आहे. तर मुंबई उपनगर-2 मधून 53 हजार 45 विद्यार्थ्यांपैकी 52 हजार 641 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्णतेची टक्केवारी 99.23 इतकी आहे.

राज्यातील एकूण 9 विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 विद्यार्थ्यांनी दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यातील 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन शाळांनी पूर्ण केले. यांपैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी पास झाले आहेत. वर्ष 2019 च्या तुलनेत गेल्या वर्षी 2020 मध्ये दहावीचा निकाल 18.20 टक्क्यांनी वाढला होता. गेल्या वर्षीच्या निकालाची टक्केवारी 95.30 टक्के होती. यंदा निकाल 4.65 टक्क्यांनी वाढला आहे. सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा लागला असून यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींचे उत्तीर्णतेचे प्रमाण जास्त आहे. यंदा 99.96 टक्के मुली तर 99.94 टक्के मुले पास झाले आहेत. यंदा राज्यातील तब्बल 1 लाख 4 हजार 633 विद्यार्थ्यांना 90 व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post