प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुराचे भीषण वास्तव मी बघितले आहे. वारंवार कोसळणाऱ्या अशा संकटांवर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा, ही स्थानिकांची अपेक्षा आहे. पण तोडगा काढताना काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. जे काही करता येणं शक्य आहे ते करणारच, कामाला गती दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशा शब्दांत पूरग्रस्तांना पुढील आपत्ती रोखण्यासाठी आश्वस्त करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. सवंग लोकप्रियतेसाठी काही करणार नाही. मी नुसतं पॅकेज घोषित करणारा नाही, तर मदत करणारा मुख्यमंत्री आहे,' अशा शब्दांत 'पॅकेज'वरून राजकारण करणाऱ्या विरोधकांनाही टोला लगावला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान महापुरामुळे निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीची पाहणी केली.यावेळी मदत छावण्यांमधील पूरग्रस्तांचे सांत्वन करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रशासनासोबत बैठक घेऊन उपाययोजनांबाबत चर्चा केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'लोकांच्या अपेक्षा आहेत की अशी संकटं दरवर्षी ओढवताहेत. आता यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. तोडगा काढायचा असेल तर येणाऱ्या अतिरिक्त पाण्याचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. त्याचा आराखडा बनवून काम सुरू करावे लागेल. कोसळणाऱ्या दरडी, खचणारे रस्ते यांचाही अभ्यास करावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सातत्याने पूरबाधित भागातील नागरिकांचे पुनर्वसन करणे ही आवश्यक बाब आहे. दरड कोसळण्याची शक्यता आहे, अशा गावांचेही पुनर्वसन करावे लागणार आहे.
कामाला गती दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
यावेळी कोसळलेलं संकट फार भयानक आहे, काही ठिकाणी दरडींखाली आपलेच माता-भगिनी गाडले गेले आहेत. सगळं आप्रित घडायला लागलं आहे. या संकटातून बाहेर पडताना जीव वाचवणं आपली प्राथमिकता असते. त्यासोबतच कोविड पसरू नये आणि पाणी साचल्यानंतर येऊ शकणारे रोग येऊ नयेत यासाठी प्रयत्न करणे, मलबा साफसफाई करणं, तिथल्या लोकांना उभं करणं हे सगळं असते. या कामाला गती दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
भिंत बांधायची एक कल्पना , पण त्यापुढे जाऊन मार्ग शोधावा लागेल !
नदी किनारी भिंत उभारण्याबाबतची भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, भिंत बांधायची कल्पना आहे असं मी म्हटलं होतं पण ती बांधायची की नाही त्यावरूनदेखील मतंमतांतरं होणार असतील, तर आपण पुढेच सरकू शकणार नाही. अशी संकटं येतात तेव्हा आपण कमिटय़ा नेमतो. त्याचे अहवाल घेतो. ते अहवाल प्रत्यक्षात अमलात आणण्याचं धाडस नसतं. मग ते आपण बासनात गुंडाळून ठेवतो. त्यामुळे आतापर्यंतच्या वडनेरे, गाडगीळ यांच्या समित्या असतील, त्यांच्या अहवालांचं एकत्रीकरण करून त्यातले ठळक मुद्दे काढा. ते लोकांच्या समोर यायला हवेत', अशा सूचना करतानाच भिंत बांधणे पर्याय असेल तर सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. नसेल तर सोडून दिला पाहिजे. मला भिंत बांधायचीच असं काही माझं म्हणणं नाही. हे अतिरिक्त पाणी, विसर्ग वगैरेमुळे पाणी आपल्याकडे घुसतं. त्याच्यावर मार्ग काढावा लागेल. यावेळी संकट ओढवू नये यासाठी जयंत पाटलांनी कर्नाटकात जाऊन तिथल्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. म्हणून किमान बऱ्याचशा गोष्टी वाचल्या पण पाऊसच इतका झाला की, आता अशा संकटांना यापुढे त्यापलीकडे जाऊन मार्ग शोधावा लागेल,' असे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आता 2020 एवढा वेळ लावू नका ! केंद्राने आता त्वरित पूर्तता करावी
केंद्राकडे होणाऱ्या मागणीबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, केंद्राकडून अपेक्षा करणे काही चुकीचे नाही. गेल्या वर्षी म्हणजे 2020 साली मागितलेले 700 कोटी रुपये कालपरवा दिले. पण यावेळी अजून काही आम्ही मागणी केलेली नाही. गरज लागेल तर मागणी करू, पण तेव्हा कृपा करून त्याची पूर्तता त्वरित करावी, अशी केंद्राकडे मागणी करतानाच एनडीआरएफचे निकष 2015चे म्हणजेच जुने आहेत. ते आता बदलण्याची गरज असल्याची विनंती केंद्राला करण्यात आली आहे. जे आपल्या राज्यासाठी आवश्यक आहे तेच आपण केंद्राकडे मागू, उगीच गुजरातला एवढे दिले म्हणून आम्हालाही द्या, असे काही आपण म्हणालो नसल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.
आता पाहणी दौरे करू नका !
आता मी पाहणी करायला आलो तेव्हा संपूर्ण प्रशासन माझ्यासोबत आहे हे मला पटत नाही. कारण त्यांची कामे सोडून ते माझ्यासोबत बसले आहेत. त्यामुळे आता पाहणी दौरा करू नका, अशी माझी सर्वांना प्रामाणिकपणे विनंती आहे. आता लोकांना धीर द्यायचा आहे. लोकांना मदत तुमच्या माध्यमातून करा किंवा सरकारच्या माध्यमातून करा, पण पाहणी करताना शासकीय यंत्रणेला अडकवून ठेवू नका, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय पाहणी पथकाने लवकर यावे. त्यांना आमंत्रणाची गरज नाही, असेही सांगितले.
जाहीर करतो , ते पूर्ण करतो
सन 2019च्या पुरातील नुकसानभरपाईच्या पूर्ततेबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मागील पुराच्या नुकसानभरपाईची पूर्तता झाली असे नाही. आपले सरकार आल्यानंतर 2019मधल्या पुरामधील नुकसानभरपाईचा मोबदला देणे सुरू झाले आहे. चक्रीवादळाच्या संकटातील शेतकऱयांनाही नुकसानभरपाई, कर्जमुक्तीसह मदत केली असून आम्ही जाहीर करतो ते पूर्ण करतो, असे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या दौऱ्यावेळी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, राज्याचे मुख्य सचिव सीताराम पुंटे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, मनपा आयुक्त कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
सवंग लोकप्रियतेसाठी काही करणार नाही !
पावसामुळे आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीचा विचार करून सरकारकडून पॅकेज जाहीर केले जावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचा मुद्दा पत्रकारांनी उपस्थित करताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, 'मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही. मी मदत करणारा मुख्यमंत्री आहे. माझे सहकारी मंत्रीदेखील मदत करणारे मंत्री आहेत. मी सवंग लोकप्रियतेसाठी काहीही करणार नाही हे आधीच सांगितले आहे. अजूनही सांगली, कोल्हापूरमधलं पाणी पूर्ण ओसरायचं आहे. या संकटाचा पूर्ण अंदाज घेतल्यानंतर मदतीवर विचार करणार आहोत. तत्काळ मदत आम्ही जाहीर केलीच आहे.
मुख्यमंत्री आमच्या मदतीला धावून येणारच ; पूरग्रस्तांना धीर
पंचगंगा आणि कृष्णेच्या संगमावर असलेल्या शिरोळ तालुक्याला नेहमीच पुराचा विळखा पडतो. महापूर शिरोळकरांच्या पाचविलाच पुजलेला आहे. आतापर्यंत येथील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या नुसत्या चर्चा झाल्या. मात्र यंदा आलेल्या महापुरामुळे खचलेल्या शिरोळकरांना धीर देण्यासाठी जेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचले त्यावेळी निश्चितच आपले मुख्यमंत्री यातून मार्ग काढतील या आशेने पूरग्रस्तांनी मोठी गर्दी केली. गर्दीतून एक तरुण उद्धव ठाकरे यांच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त करत होता. त्याच्याशी उद्धव ठाकरे यांनी आपुलकीने संवाद साधला. आपले म्हणणे मांडण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येकाशी ते बोलले. मदतीची, पुनर्वसनाची चिंता नसावी, आम्ही आहोत, असे उद्धव ठाकरे यांचे धीराचे दोन शब्दही पूरग्रस्तांना बळ देत होते. जनतेच्या आवाजाला प्रतिसाद देणारे मुख्यमंत्री आहेत… आम्ही आवाज दिला तर ते आमच्यासाठी धावून येणारच, असा विश्वास या भेटीनंतर पूरग्रस्तांनी प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केला.