पृथ्वीराजसिंग राजपूत :
कोल्हापूर - कोल्हापूर मधील प्रयाग चिखली येथील नदीमध्ये दुर्मिळ ॲलिगेटर जातीचा मासा सापडला आहे. किशोर जगन्नाथ दळवी आणि रघुनाथ दळवी या शेतकऱ्यांना मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्याला हा ॲलिगेटर जातीचा मासा लागला आहे. पहिल्यांदाच पंचगंगा नदीत आशा प्रकारचा मासा सापडल्याची घटना घडली असून अनेकांना धक्का बसला आहे. ॲलिगेटर मासा अमेरिकेतल्या गोड्या पाण्यात आढळून येतो मात्र पहिल्यांदाच या भागात या जातीचा मासा मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मासे पकडताना सापडला 'हा' दुर्मिळ मासा -
प्रयाग चिखली येथील किशोर जगन्नाथ दळवी आणि रघुनाथ दळवी आणि काही शेतकरी नेहमीप्रमाणे पंचगंगा नदीमध्ये जाळे टाकून मासे पकडत होते. मात्र त्यांच्या जाळ्यात पहिल्यांदाच अमेरिकेत आढळणारा हा दुर्मिळ जातीचा 'ॲलिगेटर' मासा सापडला आहे. माशाचे तोंड सुसरच्या तोंडासारखे दिसत असल्याने त्यांना सुरुवातीला मगरच जाळ्यात अडकली असे वाटले मात्र त्याचे बारीक निरीक्षण केल्यानंतर हा वेगळाच मासा असल्याचे समजले. काही जाणकारांना या माशाविषयी विचारल्यानंतर हा मासा 'ॲलिगेटर' जातीचा असल्याचे समजले. दरम्यान, पहिल्यांदाच असा मासा सापडल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले असून पंचगंगा नदीमध्ये आणखी असे अनेक मासे असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.