प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोल्हापूर, 28 जुलै : गेल्याकाही दिवसांत कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे ) पूरस्थिती निर्माण झाली. या अतिवृष्टीचा फटका रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांना मोठ्या प्रमाणात बसला. या महापुराचा फटका रेल्वेला सुद्धा बसला आहे. महापुराच्या पाण्यात चक्क रेल्वे रुळाखालील जमीनच वाहून गेल्याचं समोर आलं आहे.
कोल्हापूर -मिरज मार्गावर अनेक ठिकाणी रेल्वे रूळ अधांतरी असल्याचं दिसत आहे. रेल्वे रुळाखालील जमीन महापुराच्या पाण्याबरोबर वाहून गेली आहे.या ठिकाणी आता रेल्वे प्रशासनाकडून सेवा पूर्ववत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, अद्यापही रेल्वे रुळाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. एकूणच रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी मोठा वेळ लागणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. रूकडी - वळीवडे स्टेशन दरम्यान फक्त रेल्वेचे रुळ शिल्लक उरल्याचं दिसत आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी रुळाची पाहणी केली.
पाणी, वीज पुरवठाही प्रभावित
पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा सुद्धा प्रभावित झाला आहे. वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरू करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असून पूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक ताकडीने सुरू होईल यासाठी तात्काळ दुरुस्ती हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरवण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करा असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी अधिकाऱ्यांना दिले आहेत.