कराड : सततच्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या कराड मधील दोघा भावंडांनी बनवली ई-सायकल



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

कराड  : सततच्या इंधन दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या कराडमधील दोघा भावंडांनी कमाल करून दाखवली आहे. लॉकडाऊनमधील मोकळ्या वेळेचा सदुपयोग करत त्यांनी चक्क बॅटरीवर धावणारी ई-सायकल तयार केली आहे. अतुल पाटील आणि अमोल पाटील अशी या भावंडांची नावे आहेत. आपण बनवलेली ई-सायकल सिंगल चार्जिंगमध्ये 100 कि.मी. अंतर कापू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

कराडच्या तांबवे गावातील या दोघा भावंडांना लहानपणापासूनच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राविषयीचे आकर्षण आहे. शाळेत असताना लायटिंगच्या माळा रिपेअर करण्याचा त्यांना छंद होता. पुढे त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात करिअर करायचे ठरवले. अतुल पाटील यांनी एमएसस्सी इलेक्ट्रॉनिक्स केले असून त्यांनी मुंबई, पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स कंपनीत प्रॉडक्शनमध्ये काम केले आहे.तर अमोल पाटील इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर असून एका कॉलेजात ते प्राध्यापक आहे.

ई-सायकलची कल्पना कशी सुचली याबाबत दैनिक 'सामना'शी बोलताना अतुल पाटील म्हणाले, ''लॉकडाऊनमुळे पुण्यातील नोकरी सोडून मला गावी परतावे लागले. या काळात मी शेतातील कामे केली. माझ्या भावाला कॉलेजला जाण्यासाठी दिवसाला 40 कि.मी.चा प्रवास करावा लागतो. इंधन दरवाढीमुळे प्रवासावरच मोठय़ा प्रमाणात पैसे खर्च व्हायचे. इलेक्ट्रिक गाडय़ा बाजारात उपलब्ध आहेत; परंतु त्याची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याने ती सर्वसामान्यांना परवडणारी नाही. त्यामुळे स्वस्तात मस्त ई-सायकल तयार करायचे आम्ही ठरवले.''

काय आहेत वैशिष्टय़े

सायकलचा टॉप स्पीड ताशी 25 ते 30 कि.मी. आहे. पेडल आणि मोटर एकाच वेळी वापरून सायकलचा स्पीड वाढवता येतो. सायकलमध्ये 15 ऑम्पिअरची पोर्टेबल बॅटरी असून चार्जिंग संपल्यावर पेडल वापरण्याची सोय आहे. ऑटोमॅटिक मोटर बंद करणारी ब्रेक सिस्टीम असल्याने सायकल कंट्रोल करणे सोपे होते. तसेच हॅण्डलवरील डिस्प्लेमुळे सायकलचा स्पीड आणि चार्जिंग किती शिल्लक आहे या गोष्टी समजतात.

इंटरनेटवरून मिळवली माहिती

ई-सायकलसाठी लागणाऱया पार्ट्सची माहिती इंटरनेटवरून मिळवली. त्यानुसार ऑनलाईन पार्ट्सची ऑर्डर दिली. दोघेही इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राशी निगडित असल्याने आपल्याला हे काम जमेल असा त्यांना आत्मविश्वास होता. शेतातील कामे उरकून मोकळ्या वेळेत त्यांनी महिनाभरात ही सायकल तयार केली. त्यानंतर दोन महिने त्यांनी कराडमधील रस्त्यावर सायकलची ट्रायल घेतली आहे. या सायकलला त्यांनी ऊर्जा असे नाव दिले आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असणाऱया इलेक्ट्रिक गाडय़ा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. सर्वसामान्यांसाठी आमची सायकल नक्कीच फायदेशीर ठरू शकते. एका चार्जिंगमध्ये 50 कि.मी. धावणारी आणि 100 कि.मी. धावणारी अशा दोन प्रकारांत आम्ही ऊर्जा ई-सायकल तयार केली आहे. लवकरच आम्ही ही सायकल सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देऊ. - अतुल पाटील

Post a Comment

Previous Post Next Post