प्रेस मीडिया वृत्तसेवा :
‘आयजीएम’ संदर्भातील मागण्या लवकरच मार्गी लावण्याची आरोग्यमंत्र्यांची ग्वाही
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून पॉझिटिव्हीटी दर 10 टक्क्यापेक्षा कमी झाला आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यात नियमांचे पालन करुन अत्यावश्यक सेवांसह अन्य आस्थापना सुरु करण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी जिल्हा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या समवेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन निर्णय घेऊ अशी ग्वाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली.
दरम्यान, इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील आवश्यक रिक्त पदे तातडीने भरण्यासह 42 कर्मचार्यांनाही रुग्णालय सेवेत सामावून घेण्यात यावे, रुग्णालयात वाढत्या रुग्णांची संख्या पाहता येथील बेड क्षमता 300 करण्यात यावी, रुग्णालयाच्या देखभाल दुरुस्ती व आवर्ती खर्चासाठीचा 55 कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करुन द्यावा आदी मागण्यांचे निवेदनही आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी आरोग्यमंत्र्यांना यावेळी दिले. हे प्रश्नही लवकरात लवकर मार्गी लावण्याची ग्वाही नामदार टोपे यांनी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांना दिली.
याप्रसंगी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, विलास गाताडे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, आरोग्य सभापती संजय केंगार आदी उपस्थित होते.