प्रेस मीडिया वृत्तसेवा :
महाराष्ट्राच्या विधानसभेत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून तब्बल अकरावेळा निवडून गेलेले, महाराष्ट्रा सरकारमध्ये विविध खात्यांचे मंत्रिपद आणि विरोधी पक्षनेते पद भूषविणारे शेकापचे ज्येष्ठ लोकनेते भाई गणपतराव देशमुख वयाच्या ९४ व्या वर्षी शुक्रवार ता.३० जुलै २०२१ रोजी कालवश झाले.आणखी बारा दिवसांनी म्हणजे १० ऑगस्टला त्यांनी ९५ व्या वर्षात पदार्पण केले असते. महाराष्ट्राच्या कष्टकरी,अपेक्षित, वंचित , गरीब घटकाचा तारणहार असलेले एक दिग्गज नेतृत्वआपल्यातून निघून गेले आहे. अतिशय साधी राहणी आणि वंचितांच्या विकासाच्या ध्यासाची उच्च विचारसरणी हे त्यांचे वैशिष्ट्य होते. सक्षम नेतृत्व आपल्या मतदारसंघाचा पर्यायाने जिल्ह्याचा कसा कायापालट करू शकते याचे एक आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहावे लागते. सलग तीन-चार पिढ्या जनतेतून निवडून जाण्याची असामान्य किमया आबासाहेब करू शकले याचे कारण फक्त आणि फक्त त्यांची लोकांप्रती असलेली बांधिलकी.
गणपतराव देशमुख उर्फ आबासाहेब यांचा समाजवादी प्रबोधिनीशी स्थापनेपासूनचा जिव्हाळ्याचा संबंध होता. प्रबोधिनीचे संस्थापक सरचिटणीस कालवश आचार्य शांतारामबापू गरुड, विद्यमान अध्यक्ष प्रा. डॉ.एन. डी.पाटील ,संस्थापक सदस्य शहीद कॉ. गोविंद पानसरे यांच्याशी त्यांचे घट्ट ऋणानुबंध होते.त्यामुळे समाजवादी प्रबोधिनीच्या अनेक कार्यक्रमाना अनेकवेळा आबासाहेब येत असत. यामुळे गेल्या पस्तीस वर्षात माझाही त्यांच्याशी जवळचा ऋणानुबंध तयार झाला होता. तेरा वर्षांपूर्वी म्हणजे २००८ साली आबासाहेबांनी एक्याऐंशीव्या वर्षात पदार्पण केले होते. त्यानिमित्ताने " झेपावणारा ग्रामीण महाराष्ट्र "हा गौरव ग्रंथ गौरव समितीच्या वतीने प्रकाशित केला होता. त्यामध्ये ' सहकार : काल, आज व उद्या ' या आबासाहेबांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर लेख लिहिण्याची संधी मला मिळाली होती. गौरव ग्रंथ प्रकाशित झाल्यावर माझा तो लेख आवडल्याचा आबासाहेबांनी आवर्जून फोनही केला होता. अर्थात गेली अनेक वर्षे प्रबोधिनीच्या सातत्यपूर्ण कामाबद्दल कौतुक करणारा आबासाहेबांचा अनेकदा येणारा फोन ही फार मोठी ऊर्जा होती. प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकाची वार्षिक वर्गणी दरवर्षी जानेवारीच्या सुरुवातीस आठवणीने आबासाहेब पाठवत असत.हे वर्षही त्याला अपवाद नव्हते. प्रबोधनाचे आणि परिवर्तनाचे कोणतेही नियतकालिक समविचारी सहकाऱ्यांच्या, वैचारिक बांधिलकी मानणाऱ्या हितचिंतकांच्या स्वतः वर्गणीदार होण्यातूनच चालत असते याचे भान आबासाहेबांसारख्या दिग्गज नेत्यालाही होते.आपण प्रत्येकाने त्यांच्याकडून ही बाब जरी आत्मसात केली तरी ती प्रबोधनाचा विचार पुढे नेण्यात आपली मोठी कृतिशील भागीदारी ठरेल.असामान्य असूनही सामान्य राहणाऱ्या परिवर्तन चळवळीतील या दिग्गज मार्गदर्शक लोकनेत्याला समाजवादी प्रबोधिनी परिवाराचे विनम्र अभिवादन व भावपूर्ण श्रद्धांजली...