प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी ता.१८ संतांनी साहित्य कलेला मानवी संस्कृती विकसित करणारे अधिष्ठान दिले.म्हणूनच संत साहित्य हे केवळ पारायणाचे नसून आचरणाचे साहित्य आहे.
संतसाहित्य हे जागतिक साहित्याचे भूषण आहे. संतांनी समाजाला स-हित नेण्याचा प्रयत्न केला.पुनरुज्जीवनवादाला थारा न देता त्यांनी परिवर्तनाचा ध्यास घेतला.संत अखिल मानवजात एक मानत होते.जात-पात-पंथ-धर्म -श्रेष्ठ -कनिष्ठ या भेदात ते अडकले नाहीत.म्हणूनच ते खरे संत ठरले. 'म्हणोनी जातीवर्ण, हे अवघेची गा अकारण ' असे म्हणणारे ज्ञानेश्वर,' अवघी एकाचीच वीण,तेथे कैचे भिन्न भिन्न 'असे म्हणणारे तुकाराम,'कोण तो सोवळा,कोण तो ओवळा,दोन्हीच्या वेगळा विठू माझा' असे म्हणणारे चोखोबा असे सारेच संत जाती धर्माच्या पलीकडे विचार करणारे होते ,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. मी कास्ट फ्री मूव्हमेंट व राष्ट्रवादी काँग्रेस चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित 'महाराष्ट्राची कलासंस्कृती ' या व्याख्यानमालेत ' संत साहित्य ,कला - संस्कृती आणि जातीअंत ' या विषयावर ते बोलत होते.संसदरत्न खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजीतदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ही ऑनलाईन व्याख्यानमाला सुरू आहे. लेखक - दिग्दर्शक व व्याख्यानमालेचे संकल्पक डॉ.प्रशांत गेडाम यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
प्रसाद कुलकर्णी म्हणाले,मराठी संतांची शिकवण नि :संशयपणे लोक प्रबोधन आणि लोकजागरण करणारी एक प्रभावी चळवळ होती. महाराष्ट्राचे जनमानस सुसंस्कृत करण्यात संतानी फार मोठे योगदान दिले. त्यांनी चालवलेली परिवर्तनाची चळवळ ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे. सर्वांगीण समतेसाठी मराठी संतांचा सातशे वर्षापासूनचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणे हे सामाजिक,राजकीय,सांस्कृतिक समाजस्वास्थ्यासाठी आवश्यक आहे . संतांनी पारमार्थिक लोकशाही स्थापन केली.त्यांनी चमत्कारवाद नाकारला आणि कोणत्याही चमत्काराशिवाय महाराष्ट्राला जागे केले.संतांच्या भक्तिमार्गात कर्मकांडाला थारा नव्हता.संत खरेखुरे लोकप्रतिनिधी होते.लोकभाषेत त्यांनी आपले विचार मांडले.त्यातून धर्म व अधर्म विचार मांडत माणूस हीच जात आणि मानवता हाच धर्म हे स्पष्ट केले.चित्तशुद्धी व आत्मविकासाचा मार्ग सांगितला.माणुसकीवर आधारित कर्मयोग व नितीविचार सांगितला.
प्रसाद कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर ते संत गाडगेबाबा आणि संत मुक्ताबाई , बहिणाबाई , सोयराबाई आदी सर्व स्त्री संतांच्या साहित्याची अनेक उदहरणे देत आणि त्याचे समकालीन महत्व सांगत संतांचा माणुसकीवर आधारित पुरोगामी समतावादी विचार,संतांचा धर्म अधर्म विचार,माणसाचे माणूसपण नाकारणाऱ्या अधर्मविचारास विरोध,जातीसंस्थेला विरोध,अंधश्रद्धा व ढोंगीपणावरील हल्ला, कर्मयोग व नितीविचार सखोलपणे मांडला.आणि " वारा पेक्षा वारीने समतेचा जागर होतो,मी प्रबोधनाची दिंडी त्यासाठी काढत होतो " अशा शब्दात संत साहित्याचा, संत परंपरेचा जागर अपरिहार्य आहे हे अधोरेखित केले.