इचलकरंजी प्रतिनिधी :
आषाढी वारीचे औचित्य साधून तयार करण्यात आलेल्या ‘संधी दे रे विठ्ठला तुझ्या दर्शनाची’ या गाण्याचे प्रकाशन स्वानंदीच्या प्रांगणात करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप शेंडे गुरुजी होते.
ए.के प्रोडक्शनच्या वतीने प्रत्येक वर्षी आषाढी वारी निमित्त भक्ती गीतांची निर्मिती केली जाते. यावर्षी आषाढी वारी होणार नाही त्या पार्श्वभूमीवर विठ्ठलाला साकडे घालणारे संधी दे रे विठ्ठला तुझ्या दर्शनाची हे भक्तीगीत तयार करण्यात आले. त्याचे प्रकाशन आज शिवतीर्थ सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष पुंडलिकराव जाधव,रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रकाश रावळ,प्रवीण होगाडे आदींच्या हस्ते करण्यात आले. फक्त गाण्यांना वाहिलेल्या संगीत रंग या युट्युब चॅनेलचाही शुभारंभ यावेळी करण्यात आला.
पुंडलिकराव जाधव म्हणाले, या गीताच्या माध्यमातून पांडुरंग चरणी नक्कीच लीन होता येईल. काशीद यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नामुळेच इचलकरंजीकरांना इतके सुंदर गाणे ऐकण्याची संधी मिळाली आहे. दिलीप शेंडे म्हणाले, संगीत रंग च्या माध्यमातून नवकलाकारांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे त्याचा कलाकारांनी उपयोग करून घ्यावा. निर्माते व गीतकार अरुण काशीद यांनी स्वागत केले. प्रास्ताविक विकी खांडेकर यांनी केले तर आभार अनिल डांगरे यांनी मानले.
यावेळी राहुल निमणकर, सागर हारगुले, सुमेध पोदार,पंडित ढवळे, ऋषिकेश ठाकूर-देसाई , राहुल तेलशिंगे,सुमित साळुंखे,रोहित पवार, अनुराधा साळुंखे आदी उपस्थित होते.