हुपरी (वार्ताहर)
हुपरीमध्ये पालिकेतील सत्ताधारी मंडळींनी कामापेक्षा प्रसिद्धीला महत्व दिले आहे. या लोकांची प्रसिद्धी करणारी यंत्रणा फास्ट आहे. मात्र प्रशासकीय अधिकारी कोणीही असोत, सत्ता कुणाचीही असो..आपली ड्यूडी इमानेतबारे करणारे हुपरी नगरपरिषदेचे कर्मचारी खरोखरच कर्तव्याचे पालन करीत असतात.
महापूर स्थितीमुळे चार दिवस पाणीपुरवठा बंद करणेत आला होता. सुरु करणेस आठ दिवस तरी लागले असते. परंतू व्हाईट आर्मीच्या मदतीने त्यांच्या बोटीतून महापूरात जाऊन जॅकवेलमधून पाणीपुरवठा सुरु केला.महापूरात जाऊन हे धाडस करणाऱ्या हुपरी नगरपरिषदेच्या पप्पू कांबळे व सहकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद असेच आहे.पप्पू कांबळे व सर्वांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
मागील आठवड्यापासून जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीला महापूर आल्याने शहरातील पाणीपुरवठा ठप्प झाला होता. पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले होते. पण पप्पू कांबळे याच्या धाडसामुळे पाणीपुरवठा त्वरीत सुरु झाला. पप्पू कांबळे याच्या धाडसाची, नगरपरिषदेच्या वतीने तसेच राजकीय, सामाजिक स्तरावर दखल घेणेत यावे व पप्पू कांबळे यांचा हुपरीवासियांतर्फे भव्य नागरी सत्कार व्हावा असे नागरीकांतून बोलले जात आहे.