दत्तवाड-
महापुरामुळे बाधित झालेल्या गावांमधील महावितरण ची सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे, विद्युत पुरवठा करणारी संपूर्ण यंत्रणा पाण्याखाली गेल्यामुळे नदीकाठावरील ग्रामीण नळ पाणीपुरवठा योजना व गावातील विद्युत प्रवाह बऱ्याच ठिकाणी बंद आहेत. पूर ओसरत असल्यामुळे स्थलांतरित झालेले नागरिक आपापल्या गावी आणि घरी परतत आहेत, गावात परत येणाऱ्या नागरिकांच्या समोर पिण्याच्या पाण्याची आणि विजेची मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे महावितरणचे अधिकारी व कर्मचारी यांनी सर्वप्रथम गावा-गावांमधील नळ पाणीपुरवठा योजना तातडीने सुरू करण्यासंदर्भात प्राधान्य द्यावे व या योजना लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात असे आदेश सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचारी यांना दिले.
राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गुरुवारी कोल्हापूरहून पंचतारांकित औद्योगिक वसाहत कागल मार्गे हुपरी, रेंदाळ, बोरगांव मार्गे जाऊन शिरोळ तालुक्यातील हेरवाड, मजरेवाडी, नवे दानवाड, जुने दानवाड व दत्तवाड या बाधित गावांना भेटी देऊन पूर परिस्थितीचा आढावा घेतला प्रशासनातील महसूल, आरोग्य, कृषी, महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत प्रशासन या सर्व विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. नुकसानीच्या पंचनाम्याना लवकरच सुरुवात होईल व पंचनामे पूर्ण होताच शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत दिली जाईल असे ही राज्यमंत्री यड्रावकर यांनी यावेळी सांगितले. पूर ओसरल्यानंतर गावांमध्ये दुर्गंधी व घाणीचे साम्राज्य वाढते त्यामुळे ग्रामपंचायतीने स्वच्छता मोहीम हाती घेऊन ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र कडील कर्मचाऱ्यांनी साथीचे आजार पसरू नयेत यासाठी सतर्क राहावे व नागरिकांना चांगली आरोग्य सेवा द्यावी असेही राज्यमंत्री यड्रावकर यांनी शेवटी आरोग्य विभागाकडील कर्मचाऱ्यांना सांगितले.