प्रेस मीडिया वृत्तसेवा :
मालवाहू ट्रकमध्ये आंध्र प्रदेशमधून तब्बल 1 हजार 878 किलो गांजाची तस्करी करणाऱ्या सहा जणांना डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू विभागाने ससून रस्त्यावर पकडले. त्याच्याकडून 3 कोटी 75 लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याशिवाय मालवाहू ट्रक आणि मोटार जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी विलास पवार, अभिषेक घावटे,विनोद राठोड, राजू गोढवे, श्रीनिवास पवार, धर्मराज शिंदे अशी अटक केलेल्याची नावे आहेत.
डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू मुंबई विभागाला आंध्रप्रदेशमधून पुण्यात मोठया प्रमाणात गांजा तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने ससून रस्त्यावर सापळा रचून एका मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला थांबविले.त्यावेळी ट्रकमध्ये 40 पिशव्यामध्ये फणस आणि अननसमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. त्यावेळी पथकाने ट्रक चालक आणि क्लिनरला ताब्यात घेतले.
संबंधित 1 हजार 878 किलो गांजा एका मोटरीतून पुण्यात विक्री करण्यात येणार होता. त्यानुसार पथकाने मोटारीतील चार जणांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गांजा तस्करी केल्याची कबुली दिली. गांजाची आंतरराष्ट्रीय बाजारात 3 कोटी 75 लाखांवर किंमत आहे.