प्रेस मीडिया वृत्तसेवा :
महापुराच्या कालावधीत स्थलांतरित नागरिकांची बोगस बिले काढण्यासह ठेकेदारांशी हातमिळवणी, कोरोना प्रतिबंध उपाय योजनेत भ्रष्टाचार आणि सर्वसामान्य नागरिकांशी उद्धटपणे बोलणारे सांगली महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जिल्हा शिवसेनेने नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या मागणीची गंभीर दखल घेत मंत्री शिंदे यांनी आयुक्त कापडणीस यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश प्रधान सचिवांना दिला आहे. या निर्णयाने महापालिकेत खळबळ उडाली आहे.
महापालिका आयुक्तांकडून बहुतांशी कामांमध्ये भ्रष्टाचाराचा संशय असल्याने त्यांच्या खातेनिहाय चौकशीच्या मागणीसाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, आनंदराव पवार यांनी नगरविकासमंत्री शिंदे यांची भेट घेतली.महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस हे भ्रष्ट अधिकारी आहेत. महापुरामध्ये अनेक संघटना, पक्ष व दानशूर व्यक्तींनी जेवण, अन्नधान्य व इतर साहित्य दिले होते. महापुरामध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या नागरिकांची 300 ते 350 रुपये प्रतिताट याप्रमाणे जेवणाची बिले काढली. त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्याच पद्धतीने कोरोनासारख्या महामारीमध्ये शासन आर्थिक अडचणीमध्ये असताना, कोरोना प्रतिबंधित क्षेत्रात पत्रे मारण्यासाठी एक कोटी 41 लाख रुपयांचे बिल काढले आहे. त्यामध्येही त्यांनी भ्रष्टाचार केल्याचे या तक्रारीत म्हटले आहे.
कोरोना महामारीमध्ये अनेक शासकीय योजना निधीअभावी रखडल्या आहेत. अनेक कामे प्रलंबित आहेत; परंतु आयुक्त बंगल्यावर कोटय़वधींची उधळपट्टी केली आहे. याबाबत अनेक कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागितली असता, संबंधित अधिकाऱयांना माहिती न देण्याविषयी तंबी दिली आहे. अनेक प्रकरणांमध्ये मोठय़ा प्रमाणावर भ्रष्टाचार झाला असून, तो चौकशीमध्ये उघडकीस येईल. माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष कदम यांना महापालिकेच्या भ्रष्टाचाराच्या चौकशीमध्ये बोलाविण्यात यावे. त्यांच्याकडून अनेक महत्त्वाचे पुरावे व माहिती उपलब्ध होईल, असेही म्हटले आहे.
आयुक्त कापडणीस हे सांगलीला हजर होण्यापूर्वी त्यांची व त्यांच्या नातेवाईकांच्या नावावर असलेली संपत्ती किती होती व सांगलीला हजर झाल्यापासून त्यामध्ये किती पटीने वाढ झाली आहे, याबाबतची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. लोकांना अरेरावीची भाषा करणे, ठेकेदारांबरोबर हातमिळवणी करून करोडो रुपयांची माया त्यांनी जमा केली आहे. त्यामुळे खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे. त्यात दोषी आढळल्यास कापडणीस यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी जिल्हाप्रमुख विभूते यांनी नगर विकासमंत्री शिंदे यांच्याकडे केली. या प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री शिंदे यांनी प्रधान सचिवांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदे