अतिमुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने 'अतिदक्षते'चा 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. त्यामुळे 'गरज असेल तरच घराबाहेर पडा!'



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

दणकेबाज सलामी दिलेल्या मान्सूनने मुंबईसह राज्यभरात चांगलेच ठाण मांडले आहे. यातच 13 आणि 14 जून रोजी मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देत हवामान खात्याने 'अतिदक्षते'चा 'रेड अलर्ट' जाहीर केला आहे. त्यामुळे 'गरज असेल तरच घराबाहेर पडा!' असे आवाहन पालिकेकडून करण्यात आले आहे. समुद्रकिनाऱयालगतच्या परिसरातील नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी, असेही निर्देशही आपत्कालीन व्यवस्थापन खात्याकडून देण्यात आले आहेत. शिवाय पालिका कार्यक्षेत्रात असलेल्या 407 धोकादायक इमारतींवरही पालिकेचा विशेष वॉच राहणार आहे.

मुंबईत 9 जून रोजी दाखल झालेल्या मान्सूनने पहिल्याच दिवशी जनजीवन विस्कळीत केले.रेल्वे, रस्ते वाहतूक ठप्प झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. यानंतर दोन दिवस काहीसा विसावा घेणाऱया पावसाने पुन्हा आपले 'रौद्ररूप' दाखवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान खात्याकडून रविवार-सोमवार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्ट ठेवण्यात आले असून आवश्यक मनुष्यबळ व साधनसामुग्रीसह सज्ज ठेवण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी मुसळधार पावसानंतर मालाड येथे इमारतीवर इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 12 जणांचा तर दहिसर येथे तीन घरे कोसळून एकाचा मृत्यू झाल्यामुळे पालिका कार्यक्षेत्रात असणाऱया 407 धोकादायक इमारतींवर पालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेकडून विशेष नजर ठेवण्यात येणार आहे. या धोकादायक इमारतींमध्ये 59 इमारती पालिकेच्या मालकीच्या, तर 322 इमारती खासगी मालकीच्या तसेच 26 इमारती सरकारी मालकीच्या आहेत. अतिवृष्टीच्या इशाऱयामुळे सखल भागांत साठणाऱया पाण्याचा उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची 6 उदंचन केंद्रे (पंपिंग स्टेशन) व विविध ठिकाणी बसवण्यात आलेले पंप कार्यरत आहेत. त्यासाठी आवश्यक डिझेलची व्यवस्था स्थानिक पंपसंच चालकांकडून करण्यात आली आहे.

'एनडीआरएफ', तटरक्षक दल, नौसेनाही सज्ज

z पालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामग्रीसह 6 प्रादेशिक समादेशन पेंद्रांवर तैनात आहेत. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास बचावकार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ), भारतीय तटरक्षक दल, नौसेना ही सज्ज आहेत.
z याशिवाय मदत यंत्रणांतील पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, 'बेस्ट', शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांच्याशी समन्वय करण्यासाठी पालिकेचा समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहे. 'बेस्ट' आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन हाय अॅलर्टवर ठेवण्यात आले आहेत.

…तर 'मिठी' परिसरातील नागरिकांचे स्थलांतर

अतिवृष्टीमुळे मिठी नदीच्या पातळीत वाढ होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास मिठी नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे पालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बचावकार्यासाठी 'एनडीआरएफ'ची एक तुकडी तिथे तैनात ठेवण्यात आली आहे. शिवाय पालिकेच्या सर्व 24 प्रभागांत तात्पुरते मदत निवारे तैनात ठेवण्यात आले आहेत.

कमी दाबाचे क्षेत्र, पश्चिमी-पूर्व वाऱयांमुळे पूर्ण कोकणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यामध्ये रत्नागिरी-रायगडसाठी दोन दिवस रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतही बहुतांशी ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.

- शुभांगी भुते, प्रादेशिक हवामान विभाग

Post a Comment

Previous Post Next Post