गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

 गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे....गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार असल्याचा दुराभिमान वाढणे योग्य नाही....


गझल विधा : संकुचित मठ नव्हे तर व्यापक पीठ आहे

---------------------------------------------------------------

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९०)


गेल्या दशक - दीड दशकात सोशल मीडियाने सर्वच क्षेत्रात इष्ट - अनिष्ट स्वरूपाचा वेगवान हस्तक्षेप सुरू केला आहे. त्याने अनेक अर्थाने जशी जवळीक निर्माण केलीय तशीअनेक बंधने ,सीमा उध्वस्तही केल्या आहेत. या सोशल मीडियावर साहित्य ,कला या विषयावरचे अनेक समूह आहेत. त्यात कवितेचा एक प्रकार असलेल्या  गझल या काव्यप्रकाराचे ही अनेक समूह आहेत.अर्थात लेखन प्रकार लिहीणारा निवडतो आणि रसिक त्यात काव्य वा आशय शोधत असतो हे खरे. गझलेचे तंत्र आणि मंत्र या परस्पर पूरक बाबी जरूर आहेत.पण त्या पूर्णतःवेगवेगळ्या आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. मी स्वतः काही गझल समूहांवर गेली काही वर्षे सक्रिय सहभागीआहे.त्यामुळे गझलेचा विद्यार्थी या नात्याने मला जाणवलेली काही निरीक्षणे नोंदवणे गरजेचे वाटते.महत्वाचे म्हणजे विविध गझल समूहावर गझल बद्दलची विविध मते व्यक्त होत आहेत.त्यात दीर्घ,संक्षिप्त,आवश्यक ,अनावश्यक ,आकलनिय, अनाकलनीय,अशा सर्व प्रकारच्या पोस्ट असतात. त्यावर त्या त्या समूहसंख्येच्या जास्तीत जास्त  दोन -पाच - सात टक्के सदस्य चर्चा करत असतात.त्या चर्चा विषयाला धरून असतात यात शंका नाही.पण यातून आजच्या समाजमाध्यमांच्या चोवीसताशी स्वस्त सुळसुळाटात गझल किती पुढे जाईल हा प्रश्न पडतो.अर्थात गझलेचे प्रामाणिक विद्यार्थी ती पुढे नेतील यातही शंका नाही.


हा प्रश्न पडण्याचे कारण अनेक समूहातील काहीजणांमध्ये आपण गझलेचे विद्यार्थी आहोत,सहप्रवासी आहोत,हमसफर आहोत ही भावना कमी होत चालली आहे.त्याऐवजी आपण सर्वज्ञ आहोत , गुरू - महागुरू आहोत ही भावना  जास्त बळकट होते आहे.  मूठभर जयघोषी तुष्टीकरणी अंधभक्त संप्रदाय त्याचे  पुष्टीकरण करतो. हा प्रकार विधा म्हणून गझलेसाठी व माणूस म्हणून आपल्यासाठीही हानिकारक आहे. यावर लिहिता येण्यासारखं बरंच आहे. कारण हा दीर्घ आशयाचा विषय आहे.अर्थात हा विषय व्यक्तिगत नाही तर सामूहिक आहे.गझल विधा कोणाचा व्यक्तिगत अधिकार सांगणारी मालमत्ता नाही.ती सर्वव्यापी व सर्व स्पर्शी मानुष्य अभिव्यक्ती आहे. गझल हा कोणाचा संकुचित मठ नाही तर ते व्यापक पीठ आहे.


" मठोमठी मंबाजीना कीर्तने करू द्या

  विठू काय बेमानांना पावणार आहे  ?..

  

असे दादा उगाच म्हणाले नव्हते.हे मत कोणाला पटो अथवा न पटो पण मला आतून लिहावेसे वाटले.त्याला कोणीही व्यक्तिगत पातळीवर घेऊ नये.कारण आज मराठीत हजारावर कवी गझल लिहीत आहेत. त्यातील गझलेबाबत व्यक्तिगत टीका करण्याएवढे अथवा उदो उदो करण्याएवढे सर्वमान्य, सर्वव्यापी कोणीही नाही हे वास्तव आहे. हाताच्या बोटावर मोजता येतील असे काही सन्माननीय अपवाद सोडले तर मात्रवृत्ती, लय,यतीभंग, स्वर काफिया यासारख्याअनेक तांत्रिक बाबतीत वेगवेगळे प्रकार सर्वत्र दिसून येतात.अगदी माझ्यासह अनेकांकडून काही चुकाही होतात हेही खरे.मी याठिकाणी सुरेश भट घराण्याला अभिप्रेत गझलेबद्दल बोलतोय.अन्य भाषेतील उदाहरणांबाबत नव्हे.कारण केवळ तंत्र सांभाळून सुमार गझललेखन करणारी काही मंडळी मराठी गझल आता बाराखडीच्या पुढे गेलीय,किती वर्षे बाराखडीच गिरवायची? असेही मत मांडताना दिसतात.मी त्यांचा सहप्रवासी म्हणून नक्कीचआदर करतो पण याबाबत माझे मतभेदही नोंदवतो.कारण अजून आपण अजून बाराखडीही पूर्णपणे आत्मसात केली आहे असे वाटत नाही आणि म्हणूनच ही सर्वत्र दिसतही नाही.


वास्तविक दादांना जाऊन  अठरा वर्षे होऊन गेली तरी आजही मराठी गझल म्हणजे सुरेश भट हेच समीकरण आहे.पुढेही राहणार आहे.कारण दादांची गझल अस्सल व अव्वल होती,आहे व राहील.दादांच्यानंतर व त्यांच्या तुलनेत पाच - दहा टक्के रसिकांना तरी एखादा विशिष्ठ गझलकार भावतो,त्याला संपूर्ण महाराष्ट्र व मराठी भाषिक ओळखतो असे नाहीय.त्यातून समूहिकते ऐवजी मर्यादित समूहातील,कळपातील स्वयंघोषित दादांची संख्या वाढू लागली.एखाद्या गुरूचा शिष्य कमी आणि चमचा जास्त असणाऱ्यांची संख्याही वाढू लागली.मराठी कवितेत संत साहित्यापासून ढोंगी गुरुबाजीवर कोरडे ओढले आहेत.आज गझलेचा विचार करताना अशा ढोंगी गुरुबाजी बरोबरच लाळघोट्या शिष्यांचाही विचार करण्याची गरज आहे.कारण त्यातून अंतिमतः मराठी गझलेचे नुकसान होत आहे. अलीकडे ओठात भट आणि पोटात गट असलेल्यांची संख्या वाढू लागली आहे.अर्थात गटबाजीपासून अनुल्लेखा पर्यंतचा त्रास दादांनाही भोगवा लागला होता.पण शेवटी अनुल्लेख करणाऱ्यांपेक्षा दादांचीच सर्वस्तरीय रसिकप्रियता कायम आहे.


"तुमची करा आरास अन तुमचे तुम्ही लावा दिवे

तुमच्यात मी येऊ कसा ? बदनाम झंझावात मी..,

असेही दादा म्हणालेच आहेत.असो.

गझलेबाबत एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की गझल हा एक काव्यप्रकार आहे.आपण गझल लिहितो म्हणजे कोणीतरी वेगळे आहोत हा गंड काहींनी चुकीच्या पद्धतीने जपला व वाढवला. कवी असल्याच्या अभिमानापेक्षा गझलकार असल्याचा दुराभिमान वाढणे योग्य नाही. आपले प्रेम कविता व तिच्या काव्यप्रकारांवर आणि सर्व माणसांवरआहे की फक्त स्वतःवर ,स्वप्रतिमेवर आहे ? हा प्रश्न तयार होतो.गझलकारीच्या वेगळेपणाच्या नावाखाली अनेकांना ती जपणे सोयीचे झाले व छानही वाटले.सुरेश भट हे मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपतीं होते.दादांनी गझल मराठीला दिली पण ते उत्तम कवी होते हे आपण लक्षात घेतले पाहिजे.त्यांच्या कविता,गाणीही गझले इतकेच किंबहुना किंचित अधिक प्रमाणात लोकप्रिय झाली हे अमान्य करून चालणार नाही.मेंदीच्या पानावर,आज गोकुळात रंग,तरुण आहे रात्र अजुनी अशी अनेक गीते उदाहरण म्हणून घेता येतील .तसेच दादांचे गद्य लेखनही ताकदीचे असायचे.कारण त्यांची वैचारिक बैठकही पक्की होती.त्यांच्या गझलेतील सामाजिक आशय आवर्जून लक्षात घेतला पाहिजे.गझलकार हा चांगला कवी असावा ही त्यांची रास्त अपेक्षा होती.

अलीकडे समाजमाध्यमांच्या संपर्कसुलभतेने कवी म्हणून एकमेकास परिचित नसलेलेही गझल या समान धाग्याने एकत्र येत गेले,येत आहेत. ही चांगली बाब आहेच.त्यातून नव्याने गझल लिहिणारी पिढी तयार होत आहे हे फारच चांगले आहे. पण त्यातूनच गेल्या काही वर्षात गझल क्षेत्रात कंपूशाही करणे, एकमेकांची आरती ओवळणे,पुरस्कार वाटपाची दुकाने उघडणे व आपापसात उदोउदो करून घेणे , काहीवेळा रसग्रहणाचे निमित्त करून पाठी खाजवण्याचाही प्रयत्नही होतो.काही जण तर इस्लाहच्या नावाखाली सरळ गझलाच मित्राला लिहून देतात अशी चर्चाही कानावर येते.तर काही जण आपल्या गझल ज्ञानाचे भांडवल करून आर्थिक लुटही करतात अशीही चर्चा आहे.काही जणांची गंडाबंद शिष्य करण्याची गुरुत्वलादी विकृती वाढत गेली. गुरूच्या गझललेखन प्रभावाने शिष्य त्यांच्याकडे वळण्याऐवजी गुरुच शिष्य शोधत समाजमाध्यमांवर फिरू लागले असे दिसतंय. बऱ्यापैकी लिहिणाऱ्या नवख्या पण रेडिमेड गझलकाराला माझा गंडा बांध म्हणणाऱ्यांना  'नाही 'माझे मी स्वयंअध्ययन करून गझल लिहीन 'असे सांगितल्याचीही अनेक उदाहरणे आहेत.तसेच काही गंडाबंद शिष्य आपल्या तथाकथित गुरूच्या अपरोक्ष अन्य तथाकथित ज्येष्ठानाही आपले गुरू करतात व खाजगीत तुम्हीच माझे खरे गुरू असेही अनेकांना म्हणतात .काही चलाख मंडळी अलिप्तता न दाखवता सर्व कंपूत कृत्रिम आपलेपणा दाखवत राहतात व कायम चमकत राहण्यात धन्यता मानू लागतात,असे अनेक प्रकार वाढले.जे अतिशय हानिकारक ठरत आहेत.खुजेपणा आणि प्रगल्भता एकत्र कुठेच येत नसते.मग गझलेत कशी येईल ?

सुमारीकरणाचा सार्वत्रिक धोका गझलेतही आला व येतोय हे खरे आहे.लाईक आणि कॉमेंट हे आभासी जग आहे.ते उपयुक्त आहे हे खरे पण अत्यावश्यक आहेच असेही नाही.आजही सर्व मराठी जनतेला आवडणारे कवी सोशल मीडिया यायच्या पूर्वीचेच आहेत ही गोष्ट पुरेशी बोलकी आहे.तसेच मराठीतील विद्यमान मान्यवर साहित्यिक आपल्या गझलेबद्दल काय भाष्य करतात याचाही आपण प्रत्येकाने कानोसा घेतला पाहिजे.अनेकांच्या गझलांतील वेगळेपणावर ,आशय समृद्धीवर मान्यवर बोलत असतात.आपल्या समूहावर नसले तरी जाणकार रसिक गझलाही कविता व अन्य साहित्यप्रकारांबरोबर वाचत असतात.

याच बरोबर भटांचा खरा वसा आणि वारसा मानणारे व पुढे घेऊन जाऊ इच्छिणारे अनेक गझलकार व गझलकारा त्यांना जेवढी गझल कळाली आहे ती व्यक्तिगत पातळीवर कोणी मार्गदशन मागितले तर किंवा ज्याच्या कवितेत गझलेची छटा दिसते त्याला आपणहून प्रमाणिकपणे देत असतात.मार्गदर्शन करत असतात.काही सन्माननीय अपवाद तर हे कार्य सामूहिक पातळीवर वर्षानुवर्षे करत आहेत.आणि तेच  दादांचा खरा वसा व वारसा प्रामाणिकपणे जपत आहेत.ही मराठी गझलेच्या अभिमानाची बाब आहे. 

त्याचवेळी काहीजण आपण गझलकार आहोत या वेगळेपणाच्याअहंगंडात,अतार्किक,अवघड ,अनाकलनीय ,गूढ अशा गझलेच्या व्याख्या करत आहेत.त्यातुन काहीसा दर्पही अनेकदा दिसुन येतो.गझल वा शेर ज्याच्या त्याच्या मनातील विचारांच्या बिजातून तयार होत असतात.तरीही गझल कुठून सुरू होते व कुठे संपते याची चर्चा अध्यात्मिकआवी पद्धतीने केली जाते.मराठी गझलेचे भवितव्य आपण लक्ष घातले नाही तर धोक्यात आहे असेही काहीजणांना वाटत आहे असे दिसते. काहीजणांना तर दुसऱ्याची गझल दाद घेतीय हे बघून मळमळायला लागत म्हणे. तसेच दुसऱ्या समूहाच्या उपक्रमाला नाक मुरडण किंवा नावे ठेवणे सुरू होते. आपल्या कंपूखेरीज इतरांना कमी लेखण सुरू होत.काही मंडळी एखाद्याची गझल आवडली तर व्यक्तिगत कळवतात आणि काही तांत्रिक चूक राहिल्यास ती समूहावर सांगतात.यात ' मला याच्या / हिच्यापेक्षा गझल किती अधिक कळते ' हे दाखविण्याचा संकुचित हेतू असतो हे उघड आहे.शिवाय माणस दुखावतात वगैरे मानभावी भाषा सुरू होते.पण हे सारे नवे नाही.खरतर लिहिणाऱ्यानी लिहीत राहावे.बरं - वाईट रसिक ठरवताच नेहमी.

  खरतर दादांनी गझलेच्या बाराखडी व्यतिरिक्त गझलेवर फारसे भाष्य केले नाही.जे चांगल असेल ते टिकेल यावर त्यांचा विश्वास होता. कविसंमेलनात जसे सर्वच कवी उत्तम, सकस लिहिणारे,दाद मिळवणारे नसतात.हायकू लिहिणारे सर्वच उत्तम लिहीत नसतात.भावगीत लिहिणारे सर्वच उत्तम लिहीत नसतात.प्रत्येक काव्य व साहित्यप्रकाराबाबत असे असू शकते. तसेच गझलेबाबतही असू शकते.नव्याने लिहीणारा एखादा शेर असा लिहितो की आपल्या साऱ्या गझला त्यापुढे फिक्या वाटू शकतात हे वास्तव प्रामाणिकपणे स्वीकारले पाहिजे.भटांनी पन्नास वर्षे गझल लिहूनही जे भाष्य नव्या पिढीबाबत केलं नाही ते दहा - पंधरा वर्षात गझल लिहिणाऱ्यांनी करून उगीच गझलेच्या भवितव्याची वृथा चिंता करून फक्त आपल्यालाच काळजी आहे असे दाखवू नये असे मला वाटते.कारण त्यामुळे नव्याने लिहिणारे बुजतात किंवा नाद सोडतात.'वीजा घेऊन येणारी पिढी ' भटांनी पाहिली होती हे नाकारता येईल का ?

 

शेवटी गझलेकडे वळणारा निर्बुद्ध नसतो, तो तिच्या नजाकतीवर,गझलीयतेवर,शब्दकळेवर प्रेम करत आलेला असतो.आपलं सर्व बाबतीतील प्रेम जो प्रामाणिकपणे जपतो तोच खरा कलावंत होतो.त्याच्या कलाकृतीतून उरत असतो.हे  सार्वकालिक सत्य आहे.तेंव्हा लिहिणाऱ्यानी लिहीत राहावे,आपल्याला काही वाटलं तर जे योग्य मार्गदर्शक असतील तर व्यक्तिगत संवाद करावा हे जास्त योग्य. ज्यांना ज्याला गुरू,मार्गदर्शक मानायचे असते ते मानत असतातच.भटांच्या नंतर ज्यांनी ज्यांनी प्रतिभट होण्याचा प्रयत्न केला तो प्रयत्न केविलवाणा ठरला आहे.कारण त्यांच्याबाबत तुमच शिष्यत्व हवंय म्हणणाऱ्यांपेक्षा तुमच गुरुत्व नको असे म्हणणाऱ्यांची संख्या मोठी दिसून आली.याचे कारण ढोंगी गुरुबाजीतच लपलेले आहे.आणि ठरवून केलेल्या समीक्षेत लपलेले आहे.


गझल लिहिणाऱ्यांनी ती जास्तीत जास्त चांगली लिहिण्याचा प्रयत्न करावा,गझलेचा अभ्यास - वाचन - आकलन वाढवावं हे खरं.आणि गझल लिहित असलेल्यांनी उगीच ओढून ताणून समीक्षक बनू नये.गझलेचे काव्यप्रकार म्हणून पुस्तकी ज्ञान मिळवले व त्यावर लेख, प्रबंध,पुस्तके लिहिली म्हणजे त्याला उत्तम गझल लिहायला जमतेच असे कोणत्याही भाषेत उदाहरण नाही.ज्याला लिहायचे आहे त्याने प्रचंड वाचन केले पाहिजे.वाचनसमृद्धी ही लेखनसमृद्धीची पूर्वअट असते.शेवटी गझल लिहिणाऱ्यांनी आपल्याला जी अभिव्यक्ती योग्य वाटते तसेच लिहीत राहावे.आणि मार्गदर्शन करू इच्छिणाऱ्यानी आणि स्वयंघोषित समीक्षकांनी उगीच गझलेत दुर्बोधता आणू नये.गझल आपल्यासाठी की आपण गझलेसाठी  यातील फरक ज्याला कळतो त्याला रसिकही आपोआप ओळखतात.असो.तूर्त इतकेच.तेही उस्फुर्त लिहावेसे वाटले.योग्य वाटले तर आनंद आहेच. योग्य वाटले नाही तरीही आनंदच.कारण सगळ्यांनाच आवडणारा काळ वर्तमानकाळ कधीच नसतो.आणि जे हवेत असतात त्यांचा अधांतरकाळ अनिश्चित असतो. हे गझलेचा विद्यार्थी म्हणून मी पक्के जाणतो.


( लेखक कवी आहेत तसेच गेली पस्तीस वर्षे गझल हा काव्यप्रकार लिहीत आहेत.गझलांकित ( २००४ ),गझलसाद ( २०१० ) हे गझलसंग्रह व गझलानंद (२०१४ ) हे काही उर्दू -हिंदी गझलकार व त्यांच्या गझलांची ओळख करून देणारे पुस्तक प्रकाशित आहे.)

Post a Comment

Previous Post Next Post