प्रेस मीडिया वृत्तसेवा :
'निसर्ग' चक्रीवादळातील आपग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य सरकारकडून केंद्र सरकारला 1 हजार 40 कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला होता. केंद्र शासनाने फक्त 268 कोटी रुपयांची मदत केली, तर राज्य शासनाने 780 कोटी रुपयांची मदत आपग्रस्तांना केली. आता 'तौकते' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांसाठीही आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.
'तौकते' चक्रीवादळामुळे वादळग्रस्त मच्छीमारांना आर्थिक मदतीचे निकष बदaलून मिळावे यासाठी विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. या बैठकीला उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.
'तौकते' चक्रीवादळामुळे झालेल्या मच्छीमारांच्या नुकसानीसंदर्भात बँकासोबतदेखील चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात येईल.वादळग्रस्त मच्छीमारांना सरकारकडून मंजूर झालेली नुकसानीची रक्कम तत्काळ वितरित करण्याबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आदेशही संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. यापूर्वी 'निसर्ग' चक्रीवादळावेळी शासनाने जुन्या निर्णयांमध्ये आमूलाग्र बदल करून घेतल्यामुळे आपदग्रस्तांना देण्यात येणाऱया मदतीत वाढ केली आहे. मच्छीमारांच्या बाबतीत सरकार सकारात्मक असून त्यांनी केलेल्या मागण्यांबाबत सर्वानुमते योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.
महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने यावेळी मच्छीमार बांधवांच्या 'तौकते' चक्रीवादळातील झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. वाढवून मिळणारी मदत रोख रक्कम अथवा एखाद्या योजनेमार्फत मिळावी, मासळी सुकविणारे छोटे मत्स्यव्यवासायिक यांनाही मदत करावी अशा विविध मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
या बैठकीला मत्स्यव्यवसाय आयुक्त अतुल पाटणे, उपसचिव श्रीनिवास शास्त्री, राजेंद्र जाधव, कोकणचे प्रादेशिक उपायुक्त महेश देवरे, महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे सरचिटणीस किरण कोळी, ज्योती मेहेर व अन्य उपस्थित होते.
निकष बदलून वादळग्रस्तांना मदत - सुभाष देसाई
मच्छीमार बांधवांनी मांडलेल्या सर्व मुद्दय़ांवर सरकार सकारात्मक कार्यवाही करील. 'निसर्ग' चक्रीवादळाच्या वेळेसही सरकारने अनेक नियम बदलून वादळग्रस्तांना मदत केली आहे. त्याच पद्धतीने 'तौकते' चक्रीवादळग्रस्त मच्छीमारांनाही मदत देण्याबाबत शासन सकारात्मक आहे, असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.