प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : पुणे शहरात लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर वाढलेली गर्दी, करोना प्रतिबंधात्मक नियमांना व्यावसायिक आस्थापना तसेच नागारिकांकडूनही केले जात असलेले दुर्लक्ष याचे परिणाम अवघ्या दोन आठवड्यातच दिसण्यास सुरुवात झाली आहे.
शहरात मागील तीन दिवसांपासून करोना बाधितांचा दर 5 टक्क्यांपेक्षा पुढे गेला आहे.परिणामी प्रथमदर्शनी शहरातील संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याने शासनाच्या “ब्रेक दी चेन’च्या नवीन निकषांनुसार, शहराचा समावेश तिसऱ्या टप्प्यात होण्याची शक्यता आहे.
यापार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि.25) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीमध्ये शहरामध्ये निर्बंध कायम राहणार की कडक होणार हे निश्चित केले जाऊ शकते. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शहरात करोनाची साथ ओसरली, तर नवीन करोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने पुणे शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यात केला आहे.
शहरात सर्व प्रकारची दुकाने रात्री सातपर्यंत सुरू ठेवण्यास परवनगी मिळाली आहे, तर शनिवारी व रविवारी फक्त अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे. याचसह हॉटेलसुद्धा निम्म्या क्षमतेने सुरू झाली आहे.
शहरात दुसऱ्या टप्प्यातील या सवलतीचे नियम लागू आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र, मागील दोन-तीन दिवसांपासून शहरात करोनाबाधितांची संख्या वाढतानाचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर करोना संसर्गाचा दर आटोक्यात आणण्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. तसेच प्रशासनाकडूनसुद्धा हा मुद्दा मांडण्यात येणार आहे. त्यामुळे शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे लक्ष लागले आहे.
ग्रामीण भागात सवलती?
मागील आठवड्यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात करोनाचा संसर्गदर 6.71 टक्के इतका होता. आता ग्रामीण भागात करोनाचा संसर्गदर 5.86 टक्के इतका आहे. सद्य:स्थितीत ग्रामीण भागात चौथ्या टप्प्यातील सवलती लागू केल्या आहेत. करोना संसर्गदर पाहता ग्रामीण भागाचा समावेश तिसऱ्या टप्पात होत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील व्यवसाय काही प्रमाणात सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या करोना आढावा बैठकीत याबाबतच निर्णय होण्याची शक्यता प्रशासकीय स्तरावर व्यक्त होत आहे. तिसऱ्या टप्प्याच्या सवलतीस मान्यता मिळाल्यानंतर सर्व प्रकारची दुकाने सायंकाळी 4 वाजेपर्यंय सुरू ठेवता येणार आहे. तसेच, हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरू करता येणार आहे.