पुणेकरांसाठी वरदान ठरलेले जम्बो कोविड हॉस्पिटल दि. 22 जूनपासून बंद होणार



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

पुणे - करोना संकटात पुणेकरांसाठी वरदान ठरलेले जम्बो कोविड हॉस्पिटल दि. 22 जूनपासून बंद होणार आहे. येथे सध्या नवीन रुग्णांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. तर, येथे आता केवळ 100 रुग्ण असून, त्यांचेही उपचार पूर्ण होत आले आहेत. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. काही रुग्णांना 22 जूननंतरही उपचारांची गरज भासल्यास पुढील सात ते आठ दिवस हे रुग्णालय सुरू ठेवण्यात येणार आहे, असे मनपा अतिरिक्‍त आयुक्‍त रुबल अग्रवाल यांनी सांगितले.

करोनाच्या पहिल्या लाटेत 700 बेड्‌सची सुविधा असलेले जम्बो हॉस्पिटल ऑगस्ट 2020 मध्ये सुरू करण्यात आले. डिसेंबरमध्ये ते बंद करण्यात आले. मात्र, फेब्रुवारीत करोनाची दुसरी लाट आल्यानंतर 23 मार्च रोजी महापालिकेने हे हॉस्पिटल सुरू केले होते.त्यानंतर टप्प्याटप्प्याने या हॉस्पिटलची क्षमता 700 बेडपर्यंत वाढवण्यात आली.त्यामुळे एप्रिल आणि मेमध्ये हे हॉस्पिटल शहर तसेच जिल्ह्यातील रुग्णांसाठी वरदान ठरले. मात्र, दुसऱ्यांदा हे हॉस्पिटल सुरू करताना प्रशासनाने त्याचे स्ट्रक्‍चरल ऑडिट केले होते. त्यावेळी हे हॉस्पिटल 15 जुलैपर्यंत वापरता येणे शक्‍य असल्याचे सांगण्यात आले.

आता त्यापूर्वीच करोना बाधितांचा दैनंदिन आकडा सरासरी 250 वर आल्याने तसेच सक्रीय बाधितांची संख्या तीन हजारांपेक्षा कमी झाली आहे. या रुग्णालयात आता जवळपास 100 रुग्ण उपचार घेत आहेत. पालिकेने यापूर्वी येथील 400 बेड कमी केले असून, 300 बेड शिल्लक ठेवले आहेत. मात्र, त्यातील 100 जणांना या आठवड्यात डिस्चार्ज मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post