प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पुणे : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने 5 जून 2021 रोजी, रोटरी क्लब ऑफ पूना नॉर्थ, रोटरी क्लब ऑफ पुणे औंध, पुणे महानगरपालिका, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, पराडकर फाउंडेशन या संस्थांनी परस्पर सहयोगातून मोठ्या गृहनिर्माण संस्थांच्या ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनासाठीची महत्वाकांक्षी प्रकल्प जाहीर केला.
ह्यासंदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीस पुणे मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अतिरिक्त आयुक्त श्री अजित देशमुख, आरोग्य विभाग प्रमुख डॉ केतकी घाटगे, माजी रोटरी प्रांतपाल रो रवी धोत्रे, आगामी प्रांतपाल रो पंकज शहा, रो रामगोपाल राव, पुणे सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष श्री सुहास पटवर्धन, जयप्रकाश पराडकर, विनोद बोधनकर, रो समीर रूपानी, डॉ मीना बोराटे, रो मनीषा कोनकर, रो भावना उलंगवार आदी मान्यवर उपस्थित होते.
रो समीर रुपानी ह्यांनी, रोटरी मध्ये नव्याने सामील करण्यात आलेल्या पर्यावरणसंवर्धन या कार्यशाखेअंतर्गत रोटरी जिल्हा ३१३१ तर्फे हा कल्याणकारी प्रकल्प हाती घेण्यात आल्याचे स्पष्ट केले. या करता रोटरीने गृहनिर्माण संस्थांच्या व्यवस्थापनाशी संबंधित सर्व अधिकारी संस्थांना या प्रश्नावर काम करायला एकत्रीत व्यासपीठ मिळवून देऊन समन्वयकाची भूमिका घेण्याचे ठरवले आहे.
या सहकारी संघ संस्थांमध्ये पुणे महानगर पालिका नियामक आणि पालकत्वाची भूमिका बजावेल, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ हे सोसायट्यांचे प्रतिनिधी म्हणून या महासंघ व सोसायट्या ह्यांच्या मध्ये दुवा म्हणून काम करतील. पराडकर फाउंडेशन हे ओल्या कचऱ्याच्या व्यवस्थापनाचे तज्ज्ञ म्हणून सोसायट्यांना उपयुक्त सल्ला आणि मार्गदर्शन विनामूल्य उपलब्ध करुन देतील. रोटरी या कामासाठी स्वयंसेवक आणि आवश्यकता भासल्यास निधी उभारण्यात सहकार्य करेल.
आगामी किमान तीन वर्षासाठी हा प्रकल्प राबविण्यास रोटरी कटिबद्ध आहे. या प्रकल्पातून आदर्श कचरा व्यवस्थापन यंत्रणा तयार होऊन कचरा वेचकांसाठी प्रसन्न आणि आरोग्यदायी कामाचे वातावरण उपलब्ध करुन देता येईल. सुमारे ७३००टन ओला कचरा कंपोस्ट होईल तसेच जमिनीचे प्रदूषण कमी करण्यास मोलाची मदत होऊ शकेल असे प्रतिपादन रो समीर रूपानी यांनी केले.
बहुतांशवेळा, सोसायट्यांना आपल्या ओल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करायचे असूनही योग्य मार्गदर्शनाभावी पालिकेच्या व्यवस्थेवर आपला भार टाकावा लागतो. अश्या सोसायट्यांमधील रहिवाश्यांना रो मोहन पुजारी ह्यांनी रोटरीमार्फत आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले. या प्रकल्पाचे स्वरूप स्पष्ट करताना मोहन पुजारी यांनी 100% कचर्याचे ओल्या व सुक्या प्रकारातील वर्गीकरणाबद्दल जनजागृती, त्यामुळे कचरा वेचकांच्या कामात होणारा सकारात्मक बदल आणि शास्त्रशुद्ध, प्रदूषणविरहित तसेच कमीत कमी खर्चाच्या कचरा प्रक्रिया ह्या तीन मुद्द्यांवर भर दिला. ह्यासाठी शहरातील रहिवाश्यांचे प्रबोधन आणि गरज असलेली मदत ही ह्या प्रकल्पाची महत्वाची अंगे आहेत. रोटरी स्वयंसेवकांमार्फत 'ओला कचरा प्रक्रिया' या विषयावर जनजागृतीचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जातील असेही त्यांनी सांगितले.
पुणे मनपाच्या वतीने बोलताना, आरोग्य विभाग प्रमुख डॉ केतकी घाटगे ह्यांनी पराडकर फाउंडेशनने सुचवलेल्या व्यवस्थापन प्रक्रियेची वाखाणणी करताना पलिकेसमोर असलेल्या मोठ्या आस्थापनांच्या कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न धसास लावण्यासाठी पालिका सातत्याने कार्यरत असून, ३१मार्च २०२१ पर्यंत या आस्थापनांना कचरा व्यवस्थापन प्रक्रिया सुरू करण्याची मुदत जाहीर आवाहनाद्वारे दिली होती. केवळ कोरोनाच्या सावटामुळे कारवाईचा बडगा उगारला जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु जनजीवन सुरळीत झाल्यानंतर अधिनियम २०००/२०१६ च्या अंमलबजावणीची कार्यवाही तीव्र करण्यात येईल असेही त्यांनी सुचवले.
पुण्यामधील ४००० पेक्षा जास्त आस्थापने या अधिनियमा अंतर्गत दंडात्मक कारवाई साठी पात्र आहेत, त्यांनी ह्या रोटरीच्या प्रकल्पामधून आपल्या उपाययोजनांसाठी आवश्य ती मदत घ्यावी आणि कचरा नियोजनासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आणि ह्या प्रकल्पास पुणे मनपाचा पाठींबा जाहीर केला.
सहकारी गृहनिर्माण संघाच्या सचिव श्रीमती मनीषा कोष्टी यांनी जास्तीत जास्त सोसायट्यांपर्यंत ही चळवळ नेण्याचे आश्वासन दिले.
रोटरीचे आगामी प्रांतपाल रो पंकज शहा ह्यांनी पुढील तीन वर्षात कचरा व्यवस्थापन हाताळणीत पुण्याला देशात प्रथम क्रमांकाचे शहर बनवण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्यास रोटरी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. सर्व रोटेरियन स्वतःच्या सोसायटी पासून कचरा व्यवस्थापना बद्दल जनजागृतीस सुरुवात करतील असे प्रतिपादन त्यांनी केले.
लोकांच्या मनात प्रभावी परिवर्तन घडवून आणणाऱ्या या प्रकल्पाच्या सर्व सहभागींचे माजी प्रांतपाल रो रवी धोत्रे ह्यांनी अभिनंदन केले आणि ही चळवळ संपूर्ण पुण्यातील नागरिकांपर्यांत पोचवण्यामध्ये रोटरी यशस्वी ठरेल अशी खात्री व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रो दीप्ती पुजारी यांनी केले तर आभारप्रदर्शन डॉ मीना बोराटे यांनी केले.
गृहनिर्माण संस्थांना मोहन पुजारी यांच्याशी 7387340330 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल