ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे.....शरद पवार.




प्रेस मीडिया वृत्तसेवा :

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरील 'ईडी'चे छापे या गोष्टी नवीन नाहीत. केंद्रीय यंत्रणांना आलेल्या नैराश्यातून ही कारवाई सुरू असून, याबाबत अधिक चिंता वाटत नाही असे सांगतानाच, जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो. अनेक राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातदेखील यापूर्वी आपण कधी हे पाहिलं नव्हतं. केंद्राची सत्ता यांच्या हातात आल्यानंतर आपण या सगळय़ा गोष्टी पाहायला लागलो. ईडी, सीबीआयच्या माध्यमांतून सूड उगवण्याचा नवा पॅटर्न सुरू झाला आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदी सरकारवर हल्ला चढविला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातील नूतन कार्यालयाला राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी भेट दिली, त्यावेळी पवार पत्रकारांशी बोलत होते  .  

यावेळी माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी त्यांच्या सहकाऱयांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे आदी उपस्थित होते.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मुंबई आणि नागपूर या दोन्ही ठिकाणी 'ईडी'कडून छापे टाकण्यात आले. त्याबाबत विचारले असता, शरद पवार म्हणाले, 'ईडी'वगैरे आम्हाला काही नवीन नाही. अनिल देशमुखांवरील 'ईडी'चे छापे या गोष्टी नवीन नाहीत. याबाबत अधिक चिंता वाटत नाही. अनिल देशमुख यांच्या कुटुंबाला यापूर्वीदेखील यंत्रणेद्वारे त्रास दिला गेला आहे. आणखी कुठे त्रास देता येईल का, असे प्रयत्न सुरू आहेत. अनिल देशमुखांवर केंद्र सरकारच्या काही यंत्रणांनी याआधीही कारवाई केली होती; पण त्यातून त्यांना काय हाती लागलं हे मला माहिती नाही. माझ्या मते काहीही हाती लागलं नाही. त्या नैराश्यातूनच अजून कुठून त्रास देता येईल का, या विचारातून त्रास देण्याचा हा प्रयत्न आहे. त्याची चिंता करण्याचं आम्हाला काही कारण नाही.

अनेकदा सत्तेचा या पद्धतीने वापर करण्याचा पायंडा आत्ताच्या राज्यकर्त्यांनी दाखवला आहे. जो विचार आपल्याला मान्य नाही तो विचार दडपण्याचा प्रयत्न या प्रकारच्या यंत्रणा वापरून केला जातो, हे आता नवीन नाही. महाराष्ट्र आणि इतर राज्यांत असे प्रकार सुरू केले आहेत. केंद्रात हे सरकार आल्यापासून हे पाहायला मिळत आहे. मला काही चिंता वाटत नाही. लोकही त्याला गांभीर्याने घेत नाहीत, असे शरद पवार यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ

सार्वजनिक जीवनातल्या एखाद्या राजकीय नेत्याबाबत दुसऱया एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याने ठराव करण्याचे यापूर्वी कधी पाहिले नव्हते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कर्तृत्ववान गृहस्थ आहेत. आम्हाला यात काही आश्चर्य वाटत नाही, असा टोला शरद पवार यांनी लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सीबीआय चौकशी करावी, याबाबतचा ठराव भाजपच्या बैठकीत करण्यात आला या प्रश्नाला उतर देताना त्यांनी हा टोला मारला.

विनाकारण त्रास दिला जातो

हे सगळं सत्ताप्रेरित राजकारण आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करून राज्यातील नेत्यांना विनाकारण त्रास देऊन त्याचं राजकीय अस्तित्व नष्ट करण्याचा प्रकार केला जाता आहे. सीबीआय आणि ईडी काय तुमची कार्यकर्ता आहे का? जर तपास करायचा तर सगळ्यात मोठं आणि महत्वाचं प्रकरण अयोध्येतील जमीन व्यवहाराच आहे. सीबीआय आणि ईडीसाठी एकदम फिट केस असल्याचे शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले.

सीबीआयला काही मिळाले नाही म्हणून ईडी चौकशी

अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशीत काही सापडत नाही म्हणून त्यांचे आर्थिक व्यवहार तपासले जात आहे. 10 वर्षांपूर्वीच प्रकरणं बाहेर काढून त्यावरुन एफआयआर दाखल करायचा आणि छापेमारी करायची याचाच अनुभव सर्वांना येत आहे. राजकीय हेतूने केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले.

चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरील 'ईडी'च्या छाप्यांबाबत राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी नाराजी दर्शवली. यावर मी अधिक बोलणार नाही. पण चुकीच्या वेळेस चुकीच्या गोष्टी केल्या जात आहेत. सध्याच्या परिस्थितीत सर्वांचे लक्ष कोरोनाकडे असायला हवे, कुणीही काहीही मागणी केल्याने सीबीआय चौकशी होत नाही. यासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते असे ते म्हणाले.

शासकीय यंत्रणांचा गैरवापर

राजकारण हे विचारांचे आणि जनतेच्या सेवेसाठी असते. आजपर्यंत देशात शासकीय यंत्रणांचा वापर आपल्या विरोधकांसाठी झालेला पाहिला किंवा ऐकलेला नाही. शासकीय यंत्रणांचा गैरवापर ही त्यांची कार्यशैली असल्याचे दिसत आहे, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नाव न घेता लगावला. भाजपच्या सत्तेत पवार साहेबांनाही नोटीस आली होती. महाराष्ट्रात सत्तेचा गैरवापर कधीही विरोधकांना त्रास देण्यासाठी केला नाही. ही नवीन कार्यशैली आली असल्याचे त्यांनी सांगितले.

.

Post a Comment

Previous Post Next Post