प्रेस मीडिया वृत्तसेवा :
पैसे घेऊन कैद्यांना खुलेआम गुटखा, सिगारेट,तंबाखू तसेच मोबाईल पुरवणाऱ्या अलिबागच्या जेल मध्ये 'सुरंग' असल्याचे पुन्हा एकदा उजेडात आले आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका कैद्याला सामान देण्यासाठी चार हजारांची लाच मागणाऱ्या अलिबाग कारागृहाच्या जेलरला आज रंगेहाथ पकडण्यात आले आहे. सुवर्णा जनार्दन चोरगे (33) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्यांना दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या तडाख्याने भ्रष्ट अधिकाऱ्याचे धाबे दणाणले आहे.
तक्रारदार महिलेचे पती एका बिल्डरच्या हत्या प्रकरणात अलिबाग जिल्हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. जेलमध्ये पतीला आवश्यक असलेले सामान आणि सुविधा पुरविण्याकरीता या महिलेने 21 जून रोजी जेलर सुवर्णा चोरगे यांची भेट घेऊन चर्चा केली.त्यावर चोरगे यांनी सुविधा द्यायच्या असतील तर चार हजार द्यावे लागतील असे सांगितले. ठरवलेली रक्कम देण्याचे मान्य करत सदर महिलेने याबाबत अलिबाग येथील रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
दोन महिन्यांत चार अधिकाऱ्यांना बेड्या
गेल्या दोन महिन्यांत चार लाचखोर अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे. त्यात आता जेलर चोरगे यांना बेड्या ठोकल्याने कारागृहातील चाललेला भ्रष्टाचार पुन्हा एकदा बाहेर आला आहे.
जिमला जातेय, तिकडेच या.
जेलर चोरगे यांनी ठरलेली लाच घेण्यासाठी सदर महिलेला कॉल करून शेतकरी भवन जवळ बोलावून घेतले. मी जिमला जात आहे, तिकडेच मला भेट असे सांगितले. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पैसे घेताना त्यांना अटक केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस उपअधीक्षक सुषमा सोनावणे, पोलीस हवालदार दीपक मोरे, महेश पाटील, विशाल शिर्के, पोलीस नाईक जितेंद्र पाटील यांनी ही यशस्वी कारवाई केली.
अर्णबला दिला होता मोबाईल
अलिबाग जिल्हा कारागृहातील मुख्य कारागृह अधिकारी पाटील यांच्यावर अर्णब गोस्वामी याला मोबाईल पुरविल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. याप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे जेलमध्ये कैद्यांना पैसे देऊन सुविधा पुरविल्या जात असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.