प्रेस मीडिया वृत्तसेवा :
कोरोना महामारीमुळे त्रस्त असलेल्या जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून त्यामुळे महागाई भडकत आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. वर्षाभरात खाद्यतेलांच्या दरात 50 टक्के तर किराणा वस्तूंच्या दरात 40 टक्के वाढ झाली आहे.
दररोज गरज भासणाऱ्या वस्तू म्हणजे फास्ट मूव्हिंग कंज्यूमर गुड्सच्या (एफएमसीजी) दरात वर्षभरात 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या सर्वात कहर म्हणजे खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाल्याने सर्वामान्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. खाद्यतेलांचे दर दीडपटीने वाढले आहेत. गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात राईच्या तेलाचे पॅकेट 135 रुपयांना होते. त्याचे दर आता 185 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे सर्व ब्रँडेड खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत.
कोरोना महामारीच्या काळात तांदूळ, डाळ आणि साखर यांचे दरही वाढले आहेत. गेल्यावर्षी 81 रुपये किलो दराने तूरडाळ मिळत होती. आता त्याचे दर 107 रुपये किलो झाले आहेत. त्याचप्रमाणे चहाच्या पावडरचेही दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत. यात दिलासा म्हणजे पिठाचे भाव वाढलेले नाहीत. मात्र, काही बिस्किटांच्या किंमतीत वाढ झाली आहे.
तांदळाचे दर 15 टक्के, डिटर्जंट पावडरचे दर 10 टक्के, फ्लोर क्लिनरचे दर 5 टक्के, साखरेचे दर 5 टक्के वाढले आहेत. तर खाद्यतेलात सर्वाधिक म्हणजे 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीतही वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक गणीत कोलमडले आहे. दर वाढल्यावर ग्राहकांनी पाठ फिरवू नये, म्हणून काही कंपन्यांनी दरवाढ केलेली नाही. मात्र, त्यांनी वस्तूंचे वजन कमी केले आहे. काही पॅकेटमध्ये 10 ते 15 ग्रॅमने घट करण्यात आली आहे. त्यामुळे आता कोरोना महामारीसोबतच सर्वसामान्यांना महागाईचे चटकेही सहन करावे लागत आहेत.