कोरोनाचे संकट लोकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायचे हे नेतृत्वाचे लक्षण नाही...मुख्यमंत्री उद्धव ठाकरे .



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

सरकार आपले ऐकत आहे मग संघर्ष कशाला. कोरोनाच्या रूपाने केवळ महाराष्ट्रावरच नव्हे, तर संपूर्ण जगावर आर्थिक संकट घोंघावत आहे. अशा वेळेस मोठय़ा संख्येने लोकांना एकत्र बोलावून त्यांना रस्त्यावर उतरवायचे आणि कोरोनाचे संकट लोकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचवायचे हे नेतृत्वाचे लक्षण नाही, असा जबरदस्त टोला आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

सारथी संस्थेच्या कोल्हापूरमधील उपकेंद्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.सर्वप्रथम राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन, त्यांना मानाचा मुजरा करतो अशा शब्दांत त्यांनी भाषणाला सुरुवात करत मराठा आरक्षण, छत्रपती शाहू महाराज व प्रबोधनकार ठाकरे यांचे ऋणानुबंध, ओबीसी आरक्षणासाठी भाजपने पुकारलेले आंदोलन अशा विविध विषयांवर मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.सारथी दिशादर्शक

सारथीचे उपपेंद्र कोल्हापुरात झाले त्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री म्हणाले की, सारथी म्हणजे सारथ्य करणे. रथ आहे पण रथाला सारथी नाही. रथात गर्दी आहे पण रथ जाणार कुठे. म्हणून ती दिशा दाखवणारी संस्था म्हणून सारथी काम करेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

पंतप्रधानांना विनंती

आरक्षणाचा अधिकार हा आता राज्यांना नाही. केंद्राला किंवा राष्ट्रपतींना आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही विनंती केली आहे की लवकरात लवकर आपल्या अधिकारात हा निर्णय घ्या आणि या माझ्या समाजाला न्याय द्या, असे मुख्यमंत्री म्हणाले.

शाहू महाराज व प्रबोधनकारांचे ऋणानुबंध

छत्रपती शाहू महाराज आणि माझे आजोबा प्रबोधनकार ठाकरे ऋणानुबंध-स्नेहबंध जगजाहीर आहेत. कोल्हापूरकरांनाही ते माहिती आहेत. लहान असताना छत्रपती शाहू महाराजांच्या त्या सगळ्या आठवणी मी आजोबांकडून ऐकलेल्या आहेत. त्यामुळे माझ्या मनामध्ये एक छत्रपतींबद्दलची वेगळी प्रतिमा आहे. माणसाचे थोरपण कशामध्ये असते हे अनुभवले आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भावना व्यक्त केल्या. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही जुने ऋणानुबंध असल्याची आठवण त्यांनी करून दिली. जेव्हा स्वभाव जुळतात, भावना जुळतात, मतं जुळतात आणि हेतू साफ आणि स्वच्छ असेल तर हे ऋणानुबंध जुळतात, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

ओबीसी समाजही माझा

जसा हा माझा मराठा समाज आहे तसाच हा माझा ओबीसी समाज आहे. ज्याप्रमाणे शाहू महाराजांनी दीनदुबळय़ांना एक ताकद दिली ती ताकद देण्याची परंपरा हे सरकार पुढे नेत आहे. जिथे जे काही करणे आवश्यक आहे ते करत करत पुढे जाऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

मग संघर्ष का?

न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हा आंदोलनाचाच एक भाग आहे. सर्वच राजकीय पक्ष रस्त्यावर उतरतात. मी तर शिवसेना पक्षप्रमुख आहे. न्याय्य हक्कांसाठी रस्त्यावर उतरणे हे आमच्या धमन्यांमध्ये भिनलेले आहे. पण सरकार आपले ऐकत आहे, मग संघर्ष कशासाठी? ते जर ऐकत नसते तर संघर्षांसाठी तुमच्यासोबत मीच उतरलो असतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मराठा समाजाचे कौतुक

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजासाठी मागण्या केल्या आहेत. मूकमोर्चातून मराठा समाजाने ताकद दाखवली. मनात आले असते तर ते काहीही करू शकले असते, पण त्यांनी केले नाही. सामंजस्याने समजून घेतले, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काwतुक केले.

संघर्ष कधी करायचा आणि संवाद कधी साधायचा हे ज्याला कळते तो खरा नेता असतो. नुसती आदळआपट करणे याला नेतृत्व म्हणता येत नाही. समोरून मिळते आहे तरीही आदळआपट कर आणि मोडून टाक हे नेतृत्वाचे, नेत्याचे लक्षण नाही!

Post a Comment

Previous Post Next Post