प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)
आचार्य प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केलेले एक थोर अष्टपैलू व्यक्तिमत्व. १३ ऑगस्ट १८९८रोजी जन्मलेले आचार्य अत्रे वयाच्या एकहत्तराव्या वर्षी १३ जून १९६९ रोजी कालवाश झाले. साहित्यापासून राजकारणापर्यंत ,रंगभूमीपासून पत्रकारितेपर्यंत विविध क्षेत्रात अतिशय दैदीप्यमान कामगिरी त्यांनी केली. एवढे अष्टपैलू व्यक्तिमत्व मराठी विश्वात विसाव्या शतकात दुसरे झाले नाही असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. नाटककार ,विडंबनकार, चित्रपटकार ,वृत्तपत्रकार ,शिक्षणतज्ञ ,वादविवादपटू, विनोदकार ,प्रभावी वक्ता ,सव्यसाची लेखक, राजनीतिज्ञ, सामाजिक भान असलेला कार्यकर्ता, उत्तुंग नेता अशी विविधांगी ओळख व प्रत्येक क्षेत्रातील भव्य कामगिरी अन्य कोणाची दिसत नाही. अशा या अजोड व्यक्तिमत्वाला स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
पुणे जिल्ह्यातील सासवड जवळच्या कोटीन या गावी त्यांचा जन्म झाला. अत्रे घराणे हे शिवकालीन ऐतिहासिक घराण्यांपैकी एक.त्यांचे प्राथमिक शिक्षण सासवडला झाले. माध्यमिक व उच्च शिक्षण पुण्यात झाले. फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए.ची पदवी घेतल्यावर पुण्यातच कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत ते सतरा वर्षे शिक्षक व प्राचार्य म्हणून कार्यरत होते. याच काळात त्यांनी अध्यापन शास्त्रातील बी.टी. ही पदवी मुंबईहून तर टी.डी.ही पदवी लंडन मधून प्राप्त केली. अध्यापन शास्त्रातील जानतेपणामुळे अत्र्यांनी प्राथमिक शाळांसाठी 'नवयुग वाचनमाला' आणि माध्यमिक शाळांसाठी ' अरुण वाचनमाला ' यासारखे विविध उपक्रम राबवून अतिशय मौलिक स्वरूपाचे शैक्षणिक कार्य केलेले आहे.
माध्यमिक महाविद्यालयीन काळात त्यांचा पुण्यात राम गणेश गडकरी ,तात्यासाहेब कोल्हटकर, नाटककार देवल, रेव्हरंड टिळक ,बालकवी आदी अनेकांशी परिचय झाला. वयाच्या अठराव्या वर्षापासून ते 'मकरंद 'या टोपण नावाने कविता लिहू लागले.तसेच अत्र्यांनी केशवकुमार, घारुअण्णा ,घोडनदीकर, नंदकुमार ,बोलघेवडा ,सत्यहृदय इत्यादी अनेक टोपण नावानी ही लेखन केले. रविकिरण मंडळातील कवींच्या कवितांचा उपहास करणारा 'झेंडूची फुले' हा १९२५ साली आलेला त्यांचा विडंबन काव्यसंग्रह फार गाजला.आणि आचार्य अत्रे यांच्यातील उच्च प्रतिभेच्या विनोदकाराची महाराष्ट्राला ओळख झाली.
आचार्य अत्रे यांनी अनेक नाटके लिहिली.त्या नाटकांनी मराठी रंगभूमीला नवे परिमाण दिले.तसेच अत्र्यांनी अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या.' अत्रे पिक्चर्स' ही कंपनी काढली.श्यामची आई , महात्मा फुले इत्यादी चित्रपटही काढले. १९५५ साली 'श्यामची आई' या साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत त्यांच्या चित्रपटाला पहिले राष्ट्रपती पदक मिळाले होते.
१९३७ साली अत्रे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. ते पुणे नगरपालिकेवर निवडून आले. स्थायी समितीचे चेअरमनही झाले. काँग्रेसच्या राजकारणाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी १९४० साली त्यांनी ' नवयुग 'हे मासिक सुरू केले.पुढे स्वातंत्र्यावेळी झालेल्या फाळणीमुळे अत्रे काँग्रेसमधून बाहेर पडले.आणि अखेरपर्यंत ते काँग्रेसचे विरोधकही राहिले.त्यानंतर १९५५ साली संयुक्त महाराष्ट्र आंदोलन सुरू झाले.आचार्य अत्रे त्याचे नेते बनले.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनासाठी १९५६ साली त्यांनी 'दैनिक मराठा' सुरू केले. अत्र्यांनी नवयुग व मराठा मधून जहाल व प्रखर असे प्रचंड लेखन केले. अंदाजे दहा हजार पाने भरतील एवढे हे लेखन होते.या लेखनातील काही भागांची पुढे मी कसा झालो?, मुद्दे आणि गुद्दे ,सिंहगर्जना, सूर्यास्त ,आषाढस्य प्रथम दिवसे, अध्यापक अत्रे अशी अनेक पुस्तके तयार झाली. अत्रे विधानसभेवर आमदार म्हणून ही निवडून गेले होते.
'कर्हेचे पाणी' हे पाच खंडात प्रकाशित झालेले त्यांचे आत्मचरित्र ही प्रचंड गाजले. अत्रे घराण्याच्या पूर्वपिठीके पासून १ मे १९६० रोजीच्या महाराष्ट्र राज्याच्या निर्मिती पर्यंतचा प्रचंड मोठा ऐतिहासिक,कौटुंबिक,सामाजिक,राजकीय पट या आत्मचरित्रातून उलगडलेला आहे. १९४२ च्या नाशिक येथे भरलेल्या सत्तावीसाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५५ च्या बेळगाव येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे आणि दहाव्या मराठी पत्रकार संमेलनाचेही ते अध्यक्ष होते.अत्र्यांच्या सर्वच लेखनात व भाषणात खळाळता विनोद होता. ताजेपणा होता. थोडा शिवराळपणा होता. तसेच काहीवेळा अतिशयोक्तीही होती. पण कमालीचे आक्रमक ,धाडसी ,बेदरकार,प्रगल्भ असलेले आचार्य अत्रे अव्वल दर्जाचे उत्तुंग प्रतिभावंत अष्टपैलू व्यक्तिमत्व होते.
१९४२ च्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील त्यांचे अध्यक्षीय भाषण आजही अतिशय महत्त्वाचे आहे.आज एकीकडे साहित्यातून सत्य ,विदारक वास्तव वर्तमान मांडणाऱ्याऱ्या साहित्यिकांना ' साहित्य नक्षली ' ठरवण्याचा प्रयत्न होतो आहे. घटनादत्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत.अशावेळी अत्र्यांचे ते भाषण अनेक अर्थानी महत्त्वाचे आहे. त्या भाषणात अत्रे म्हणाले होते ," जीवनाची जी चिरंतन मूल्ये आज मानव जातीच्या प्रगतीपथावर ध्रुवा ताऱ्याप्रमाणे आढळत तेजाने तळपत आहेत, ती मुल्ये आणि सत्ये ही मानव जातीला साहित्याने दिलेली लेणी आहेत. आजच्या युगात मानवी जीवनाला आवश्यक असणारे साहित्य हे सहावे महाभूत आहे. स्वतंत्र राष्ट्राला सैन्यापेक्षा आणि आरमारा पेक्षा आज साहित्याची जास्त जरुरी आहे.कारण सैन्य आणि आरमार फार झाले तर जिवंत राष्ट्राचे रक्षण करू शकेल. पण राष्ट्राला जिवंत ठेवण्याचे काम केवळ साहित्य करू शकते. राष्ट्राच्या पौरुषाच्या आणि पराक्रमाच्या परंपरा जिवंत राखून त्याग ,धैर्य, आणि शौर्य हे गुण जनतेच्याअंगी येण्यास बंदुका आणि तोफा यांच्या पेक्षा साहित्याचाच उपयोग जास्त होतो." आपल्या भाषण अत्र्यांनी भांडवलशाही व्यवस्था अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कशी गळचेपी करते याचे वर्णन करून जगाची पुनर्रचना करण्यासाठी 'मानवतेची सनद 'असली पाहिजे हेही नमूद केले. भारत स्वतंत्र होण्यापूर्वी पाच वर्षे अत्रे ही भूमिका मांडत होते यावरून त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते. बंदुकीने युद्धे होत असली तरी ती लेखणीनेच निस्तरावी लागतात. आमचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि राखण्यासाठी आम्ही आमचे सर्वस्व धुळीला मिळवू आणि आम्ही स्वतंत्र झालो तरच बाकीचे जग स्वतंत्र होईल हे पक्के लक्षात ठेवा असा सार्वकालिक श्रेष्ठ संदेश देणाऱ्या व सर्वार्थाने श्रेष्ठ असलेल्या आचार्य अत्रे यांना विनम्र अभिवादन.
----------------------------/------------ ------ - - ---/------/--