प्रेस मीडिया वृत्तसेवा :
इचलकरंजी - कोरोनाचा वाढता संसर्ग, निर्माण झालेली परिस्थिती आणि धोका वाढण्याची शक्यता याचा सारासार विचार करुन इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने चतुर्थ वार्षिक कर कर आकारणीसाठी हाती घेण्यात आलेल्या मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचे आदेश नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी दिले आहेत.
नगरपरिषदेच्यावतीने दर चार वर्षांनी शहरातील मालमत्ताधारकांच्या मिळकतीचे सर्व्हेक्षण करुन त्यानुसार कर आकारणी केली जाते. गतवर्षी कोरोना महामारीमुळे नगरपरिषदेच्यावतीने केले जाणारे चतुर्थ वार्षिक कर आकारणीचे काम स्थगित ठेवण्यात आले होते. त्यामुळे सन 2021-22 ते 2024-25 सालासाठीच्या कर आकारणीसाठी मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम हाती घेऊन त्यासाठी कर्मचार्यांची नियुक्तीही केली होती. या संदर्भात शुक्रवारी इचलकरंजी शहर काँग्रेस कमिटी व उपनगराध्यक्ष तानाजी पोवार यांच्यावतीने शहरातील सद्यस्थितीचा विचार करुन सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली होती. याची दखल घेत नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी या कामासंदर्भात मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल यांच्याशी चर्चा केली.
इचलकरंजी शहर हे कामगारांचे शहर असून शहरात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे वस्त्रोद्योगासह सर्वच औद्योगिक क्षेत्र ठप्प झाले असून सर्वांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा विचार करुन मालमत्तांच्या सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात सर्वपक्षीय बैठक घेऊन चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. तोपर्यंत चतुर्थ वार्षिक कर आकारणीसाठी सर्व्हेक्षणाचे काम थांबविण्यात येत असून त्या संदर्भात संबंधित विभागप्रमुखांना सूचना केल्या असल्याचे नगराध्यक्षा सौ. स्वामी यांनी सांगितले.