प्रेस मीडिया वृत्तसेवा :इचलकरंजी : प्रतिनिधी :
सध्या पावसाळा सुरु असून शहरातील सर्वच सारण गटारींची तातडीने स्वच्छता व साफसफाई करुन घेण्यासह डेंग्युची साथ उद्भवू नये यासाठी सर्व्हेक्षण करुन पाणी साठे तपासून औषध फवारणी करण्याच्या सूचना नगराध्यक्षा अॅड. सौ. अलका स्वामी यांनी आरोग्य विभागातील अधिकार्यांना बैठकीत दिल्या. त्याचबरोबर सर्व कामांच्या पूर्ततेकामी पुढील आठवड्यात पुन्हा आढाव बैठक घेण्यात येईल, असेही सांगितले.
पावसाळ्याला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने शहरातील सारण गटारींची स्वच्छता, आजार उद्भवू नयेत म्हणून आवश्यक उपाययोजना व शहरातील साफसफाई स्वच्छता संदर्भात नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांनी सोमवारी आरोग्य विभागातील अधिकारी व प्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी नगराध्यक्षांनी सद्यस्थितीची माहिती जाणून घेतली.
आरोग्य विभागाकडून शहरातील वॉर्ड नं. 1 ते 6 आणि 12, 16, 17 व 19 या भागातील सारण गटारींची स्वच्छता नगरपरिषद कर्मचार्यांकडून तर 7, 8, 9, 10, 11, 13, 14, 15, 18 व 20 ते 26 या वॉर्डातील सारण गटारींची स्वच्छता खाजगी मक्तेदारामार्फत केली जात असल्याचे सांगण्यात आले. यावेळी काही वॉर्डातील सारण गटारींची अद्याप स्वच्छता न झाल्याचे निदर्शनास आल्याने नगराध्यक्षांनी संबंधि मक्तेदाराला आठवडाभरात कोणतेही कारण न सांगता गटारींची स्वच्छता करण्याच्या सक्त सूचना केल्या. त्याचबरोबर शहरात डेंग्युसह इतर आजार उद्भवू नयेत यासाठी सर्व्हेक्षण करण्यासह भागाभागातील पाण्याचे साठे तपासणीसह औषध फवारणी करण्यात यावी. कचरा डेपोवरील कचर्याची लेवल करण्याचे काम सध्या बंद असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाल्यानंतर नगराध्यक्षांनी संबंधित मक्तेदाराशी संपर्क साधून तात्काळ काम सुरु करण्यास सांगितले. त्याचबरोबर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासह कुत्र्यांचे निर्बिजीकरणबाबत तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले. या सर्व कामांबाबत पुढील आठवड्यात पुन्हा आढावा बैठक घेण्यात येणार असल्याचे सौ. स्वामी यांनी सांगितले.
बैठकीत आरोग्य सभापती संजय केंगार, आरोग्य विभाग प्रमुख विश्वास हेगडे, मुख्य स्वच्छता निरिक्षक सुर्यकांत चव्हाण, स्वच्छता निरिक्षक विजय पाटील, अन्य अधिकारी व मक्तेदार उपस्थित होते.