राजकीय श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न; आमदार आवाडेंची टिका



इचलकरंजी : प्रतिनिधी : 

इचलकरंजी : वस्त्रोद्योगाला भेडसावणारे प्रश्‍न सोडविण्यासाठी वेळ देणे, लक्ष देणे हे आता बाजूला पडत चालले आहे. कोणाच्या कोंबड्याच्या आरवण्याने सुर्य उगवतोय काय? हे बघण्यासाठी शहरातील काही नेतेमंडळींमध्ये चढाओढ सुरु झाली आहे. पक्षीय कार्यकर्त्यांना बोलावयाचे, मर्यादित बैठका घ्यायच्या असे कार्यक्रम सुरु झाले आहेत. आणि त्यातून प्रश्‍न सुटलाच तर आमच्यामुळेच झाले असे दाखवता येईल काय, याचा केविलवाणा प्रयत्न या राजकीय पक्षाच्या मंडळींचा सुरु आहे, अशी जळजळीत टीका आमदार प्रकाश आवाडे यांनी आज केली.

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ताराराणी पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात आमदार आवाडे बोलत होते. मंबई येथे काही यंत्रमाग उद्योगातील  प्रश्नांबाबत बैठक झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आवाडे यांनी आज पून्हा एकदा हल्लाबोल केला. ते म्हणाले, इचलकरंजी नगरपरिषदेच्या आगामी निवडणूक कोणाशी चर्चा नाही, कोणासोबत आघाडी करायची नाही. ताराराणी पक्षातर्फे ही निवडणूक स्वबळावरच लढवायची हे ठरलेले आहे. वस्त्रोद्योगाच्या प्रलंबित प्रश्‍नांसह रेशन आणि सर्वसामान्यांना आवश्यक नागरी सुविधा मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. आपल्याला केवळ लढायचे नसून जिंकण्यासाठी लढायचे आहे.

वाढत्या कोरोनाबाबत व्यक्त केली चिंता

सध्या शहर आणि परिसरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. तो रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. विशेषत: गावभाग, कलावंत गल्ली, तांबेमाळ, जवाहरनगर, शहापूर भागात बाधितांची संख्या जास्त असल्याने त्या त्या भागातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जागरुकता करुन कोरोनाला थोपवून शहर कोरोनामुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात आवश्यक त्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्या मिळवून देणारच आहे, अशी ठाम ग्वाही आवाडे यांनी दिली. 

मत्र्यांवर केला हल्लाबोल...

इचलकरंजीला डावलून जिल्ह्यात राजकारण चालले आहे. मंत्रीमहोदय काहीही म्हणू देत, माझे काय होणार याची कोणीही काळजी करु नका. त्यासाठी मी घट्ट आहे. इतरांपेक्षा मी त्यांना अवघड वाटत असल्यानेच ते मला दबकून आणि घाबरुन आहेत. त्यांना काय करायचे ते करु दे, वस्त्रनगरीला आवश्यक ते सर्वकाही आणण्यास मी समक्ष आहे, असेही आमदार आवाडे म्हणाले.कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचे आवाहन शहराला शुध्द व मुबलक पाणी मिळण्यासाठी दूधगंगा योजना पूर्णत्वास न्यायची आहे. वस्त्रोद्योगासाठी 5 टक्के व्याज अनुदान, वीज सवलत, रेशन व्यवस्था या संदर्भात आवाज उठवायचा आहे. प्रत्येक अन्यायाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडवावेत. शहरात छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासंदर्भातील विषयाला गती मिळत आहे. पुढील वर्षी छ. संभाजी महाराज याच्या जयंती दिनी संभाजी चौकात महाराजांचा पुतळा निश्‍चितपणे बसविण्यात येईल. या सर्वच कामांसाठी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. आपल्याला केवळ लढण्यासाठी लढायचे नसून जिंकण्यासाठी लढायचे आहे, असेही आमदार आवाडे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post