ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे.आपल्या लेखनाचे आणि वाणीचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीने वयाची शंभरी पार करणे ही अतिशय आनंददायी बाब आहे. एक लेखक,संपादक,वक्ता,कार्यकर्ता म्हणून मला आनंद देणारे कॅप्टन रामभाऊ हे असे एकमेव व्यक्तिमत्त्व दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे..
प्रेस मीडिया वृत्तसेवा :
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन दशकांनी जन्माला आलेल्या माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जन्मदात्यांच्यानंतर सर्वात आदर कोणाचा वाटत असेल तर तो भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा. शब्दश: जीवाची बाजी लावून,मृत्यूची पर्वा न करता या आंदोलनात झोकून देणे हे काम साध सोपं नव्हतं. अशा काही स्वातंत्र्यसैनिकांना मला जवळून अनुभवता आले. त्यांच्याशी बोलता आलं.त्यांना ऐकता आलं.त्यामुळे मी अनेकदा भरून पावलो आहे व भारून गेलो आहे.त्यापैकी एक नाव म्हणजे स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन रामभाऊ श्रीपती लाड.मंगळवार ता. २२ जून २०२१ रोजी त्यांनी वयाच्या शंभरीत प्रवेश केला. ही अतिशय आनंदाची बाब आहे.या शंभरीनिमित्त मी त्यांना मनःपूर्वक व भरभरून शुभेच्छा देतो.वयाच्या शंभरीतही कॅप्टनभाऊंची स्मरणशक्ती जबरदस्त आहे.आजही ते आठवणी सांगतात व स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रसंगांचे शब्दचित्र उभे करतात.शंभराव्या वाढदिवसादिवशी कॅप्टन भाऊ सक्रिय आहेत ही विचारनिष्ठ ऊर्जा आहे यात शंका नाही.
कॅप्टन रामभाऊ व माझा परिचय अर्थातच समाजवादी प्रबोधिनी आणि थोर विचारवंत स्वातंत्र्य सैनिक आचार्य शांताराम गरुड यांच्यामुळे झाला. किर्लोस्करवाडी, कुंडल परिसरातील अनेक कार्यक्रमांच्या निमित्ताने गेल्या पस्तीस वर्षात कॅप्टन रामभाऊ मला अनेकदा भेटले आहेत. काही वेळा त्यांच्या घरीही मी गेलेलो आहे.त्यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाचाही मी साक्षीदार आहे. त्यांचा धारदार आवाज आणि परिवर्तनाचे काम करण्याची ऊर्मी अतिशय विलक्षण आहे.' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' या मासिकातील माझे 'संपादकीय' आणि अन्य लेखन वाचून अभिनंदनाची अनेक पत्रे कॅप्टन रामभाऊनी मला पाठवलेली आहेत. माझ्या अनेक व्याख्यानांना श्रोता म्हणून आलेल्या कॅप्टन रामभाऊंनी माझे त्या त्या विषय मांडणीबद्दल कौतुक केले आहे. आपल्या लेखनाचे आणि वाणीचे कौतुक करणाऱ्या व्यक्तीने वयाची शंभरी पार करणे ही अतिशय आनंददायी बाब असते. एक लेखक,संपादक,वक्ता,कार्यकर्ता म्हणून मला आनंद देणारे कॅप्टन रामभाऊ हे असे एकमेव दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे.
तुफान सेनेच्या सेनानीने दिलेली शाबासकी व प्रोत्साहन मला नेहमीच अनमोल वाटत आलेले आहे. कारण त्यांच्या पत्र लेखनामध्ये व प्रतिक्रियेत केवळ निर्जीव शब्द नाही तर आंतरिक तळमळ मी अनुभवली आहे. वास्तविक अवघ्या दुसरी पर्यंतचे शिक्षण झालेले कॅप्टन भाऊ लिहितात तेव्हा त्या घटना-घडामोडी आपल्यासमोर उभ्या राहतात. आपल्या सहकाऱ्यांची त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्रे स्वातंत्र्य आंदोलनातील त्या नायकांचे साक्षात व उत्तुंग दर्शन घडवतात.
कॅप्टन रामभाऊ लाड हे केवळ कुंडल परिसर व सांगली जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला परिचित असे स्वातंत्र्यसैनिक आहेत. १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात किर्लोस्करवाडी कारखान्या मोल्डिंग विभागात करत असलेली नोकरी सोडून ते सक्रिय सहभागी झाले. त्यानंतरच्या काळात गावोगावी राष्ट्रसेवा दलाच्या शाखा उभारणे, भूमिगत क्रांतिकारकांच्याठी व्यायामशाळा काढणे ,क्रांतिकारकांना सहाय्य करणाऱ्यांना नेमके मार्गदर्शन करणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिसरकार मध्ये तुफान सेनेचा प्रमुख कॅप्टन म्हणून त्यांनी काम केले. हैदराबाद मुक्ती संग्रामात सहभाग ,बुलढाणा यवतमाळसह विदर्भाच्या अनेक भागात तुफान सेनेच्या शाळातून हजारो तरुणांना प्रशिक्षण देणे ,संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात सक्रिय सहभाग घेणे, क्रांतिसिंह नाना पाटील व क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड यांच्या बरोबरीने स्वातंत्र्य आंदोलनात ते कमालीचे कार्यरत राहिले.
स्वातंत्र्यानंतरही सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते सर्व परिचित आहे. ज्यांच्या कर्तृत्वापुढे नतमस्तक व्हावे आणि आणि ज्यांच्या धगधगत्या मशालीतून समकालीन परिवर्तनाच्या चळवळीसाठी काही प्रेरक ठिणग्या घ्याव्यात अशी माणसे फार कमी आहेत. म्हणूनच कॅप्टन रामभाऊंचे प्रेरणादायी शतकीय अस्तित्व अतिशय महत्त्वाचे आहे.
कॅप्टन रामभाऊंनी 'असे आम्ही लढलो 'आणि 'प्रतिसरकारचा रोमहर्षक रणसंग्राम ' ही दोन पुस्तके लिहिलेली आहेत. तीनशे पानांच्या या लेखनात कॅप्टन रामभाऊनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलन, त्याची सैद्धांतिक भूमिका आणि सातारा-सांगली जिल्ह्याचे या आंदोलनातील असामान्य योगदान, त्या आंदोलनातील बिनीचे शिलेदार यांचा आढावा घेतला आहे .त्याचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे.कारण या इतिहासात स्वतः महत्त्वाची कामगिरी केलेल्या कॅप्टन भाऊंनी ते लिहिलेले आहे.
स्वातंत्र्य कशासाठी आणि कोणासाठी मिळवले याबाबत कॅप्टन भाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका निश्चित होती व आहे. म्हणूनच आज स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात त्याला आलेले स्व- तंत्राचे स्वरूप कॅप्टन भाऊंना अस्वस्थ करते. याच साठी केला होता का अट्टाहास ? हा प्रश्न त्यांना पडतो. गेली अनेक दशके कॅप्टन भाऊ आपल्या लेखणीतून वाणीतुन ते सांगत आले आहेत. कुंडल परिसरात झालेल्या माझ्या अनेक भाषणानंतर झालेल्या चर्चेत त्यांची ही तळमळ मी अनुभवली आहे. तुफान सेनेच्या या रांगड्या प्रमुखाला 'कॅप्टन ' ही पदवी नेहमीच शोभून दिसते.या कॅप्टनच्या वैचारिक संघाचा सदस्य असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.
भवतालचे सामाजिक ,राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक वातावरण बघून कॅप्टन भाऊ अस्वस्थ होतात. म्हणून तर त्यांच्या मनात हे सारं बदलायचं असेल तर दुसरा स्वातंत्र्य लढा लढायला हवा अशी ऊर्मी येते. इंग्रजी साम्राज्यवादी इथल्या जनतेचे सर्वांगीण शोषण करत होते.त्यांना स्वातंत्र्यसैनिकांनी प्राणाची बाजी लावून हाकलून दिले. पण इंग्रज गेल्यावर येथील सत्ताधाऱ्यांनी त्यांचाच शोषण कारभार पुढे सुरू ठेवला याची खंत कॅप्टन भाऊंना आहे.म्हणूनच दहा वर्षांपूर्वी वयाच्या नव्वदीत त्यांनी एका लेखात लिहिले होते की," कोणत्याही देशाचे भविष्य हे त्या देशातील माणसांच्या आचार विचारांवर अवलंबून असते. आज विचार संकुचित झाला आहे. स्वार्थी झाला आहे. आजच्या विचारात ध्येयवाद नाही, आशावाद नाही. जो आहे तो माणुसकीहीन आचार विचार.देशप्रेम ,राष्ट्रप्रेम ,मानव प्रेम सत्ताधाऱ्यांच्या हातातील गुलाम झाले आहे.आज स्वातंत्र्याला पासष्ठ वर्षे होऊन गेल्यावर स्वातंत्र्याचे सुराज्य व्हावे यासाठी आम्हाला स्वातंत्र्यसैनिक म्हणून वाटते की क्रांतीतंत्र आणि दबावतंत्र यांचा वापर करून दुसरा क्रांति लढावे लागेल."
देशाची आजची सर्वांगीण परिस्थिती पाहिली की कॅप्टन भाऊंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वस्वाचा त्याग करून १५ ऑगस्ट १९४७ रोजी जे स्वातंत्र्य मिळवलं ते लुप्त झाल आहे आहे अशी शंका येते. सतरा सार्वत्रिक निवडणुकांनंतर सुद्धा जर आपण भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाने दिलेली वैश्विकमूल्ये आणि भारतीय राज्यघटनेने सांगितलेलं तत्वज्ञान रुजवण्यासाठी योग्य पावले टाकत नसू तर ती कमतरता आपली आहे. ही कमतरता भरून काढायची असेल तर कॅप्टन भाऊंसारख्या आदरणीय अशा आकाशाच्या उंचीच्या माणसांचं महत्त्व आपण जाणून घ्यायला हव.कॅप्टन भाऊ वयाच्या शंभरीत पदार्पण करत असताना त्यांना शुभेच्छा देतानाच त्यांच्या मनातला शोषणवीरहीत स्वतंत्र भारत निर्माण करण्यासाठी आपण अधिक सक्षमपणे कटिबद्ध राहूयाअसा त्यांना विश्वास देतो.
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली बत्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)