हातकणंगले तालुका / प्रतिनिधी: आप्पासाहेब भोसले
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींचे राजकीय प्रतिनिधित्व कायम ठेवा, जातवार जनगणना झालीच पाहिजे, पदोन्नतीमध्ये ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे, इंपेरिकल टाडा करणेसाठी तज्ञांची समिती तत्काळ नेमा, ओबीसी आरक्षण मधील सधन व उच्चवर्गीय लोकांची घुसखोरी थांबलीच पाहिजे, या प्रमुख मागण्यांकडे शासनाचे व मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी ओबीसी जनमोर्चाचे अध्यक्ष प्रकाशआण्णा शेंडगे यांचे आदेशा नुसार आज (दि.२ जून) शिरोळ तहसिलदार यांच्या कार्यालयासमोर सकाळी जोरदार निदर्शने करून नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांना निवेदन देण्यात आले.
नांदणीचे ग्रामपंचायत सदस्य दीपक कांबळे यांनी प्रास्ताविक करून आंदोलनाचा उद्देश स्पष्ट केला. ओबीसी सोशल फौंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब बागडी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील धोक्यात आलेले ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्यसरकारने कोर्टाच्या निर्णयानुसार कारवाई करावी, मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांना पदोन्नतीमध्ये आरक्षण लागू करावे आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी केली. ओबीसींच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास आगामी काळात मोठे आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नायब तहसीलदार पी. जी. पाटील यांनी निवेदन वरिष्ठ पातळीवर पाठवीत असल्याचे सांगितले.
प्रारंभी कार्यकर्त्यांनी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या.
यावेळी सुरेश सासणे, महेश परीट, संजय सुतार, इब्राहीम मोमीन, संजय गुरव, बबन बंने, ग्रामपंचायत सदस्य दिलीप परीट, संजय परीट, प्रकाश तगारे, बबन भुई, तुळशीदास माने, तानाजी गंगधर, दत्तात्रय यादव आदी ओबीसी समाज संघटनेचे सक्रिय कार्यकर्ते, पदाधिकारी, ओबीसी बांधव उपस्थित होते.