हातकणंगले तालुका /प्रतिनिधी: आप्पासाहेब भोसले
छ. शिवराय, म. जोतिबा फुले, राजर्षी छ.शाहू महाराज, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीतील अभ्यासू व जाणकार व्यक्तिमत्व, नांदणी गावचे सुपुत्र संजय भिमराव गुरव यांची शिरोळ तालुका काँग्रेस (आय) ओबीसी सेलच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, उद्यानपंडित गणपतरावदादा पाटील, शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे आणि ओबीसी सेलचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस अशोकराव कोळेकर यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दत्त कारखाना कार्यस्थळावर देण्यात आले.
गेल्या वीस वर्षांमध्ये संजय गुरव यांनी बहुजन आणि ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि प्रगतीसाठी विविध प्रकारचे काम केले आहे. शिरोळ तालुका ओबीसी सोशल फाउंडेशन, ओ. बी. सी. सेवा फाउंडेशन आणि बारा बलुतेदार सामाजिक संघर्ष परिषदेच्या माध्यमातून बहुजन, ओबीसी समाजातील सर्वसामान्यांना मार्गदर्शन, व्याख्याने, समाज जागृती आणि प्रबोधन करण्यात त्यांचा नेहमीच पुढाकार राहिलेला आहे. ओबीसी चळवळीच्या माध्यमातून ओबीसींच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम त्यांनी केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.
काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणानुसार आपण पक्ष वाढवण्यासाठी आणि ओबीसींचे प्रश्न सोडवण्यासाठी मोठे प्रयत्न करू, अशी ग्वाही यावेळी संजय गुरव यांनी दिली. शिरोळ तालुका काँग्रेसचे अध्यक्ष सर्जेराव शिंदे, अशोकराव कोळेकर यांनी संजय गुरव यांना शुभेच्छा दिल्या.
पंचायत समितीच्या माजी सभापती अर्चना चौगुले व मिनाज जमादार, युवक काँग्रेस कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष नितीन बागे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष तातोबा पाटील,नगरसेवक योगेश पुजारी, सदाशिव पोपळकर, तालुका उपाध्यक्ष राजू मोगलाडे, नांदणी जिल्हा परिषदकाँग्रेस प्रमुख महेश परीट,सिद्राम कांबळे, आशिष कुरणे, दादा चौगुले, ग्रा. पं.सदस्य शीतल उपाध्ये, दीपक कांबळे, संजय सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.