प्रेस मीडिया वृत्तसेवा :
डेहराडून – उत्तराखंडमधील कुंभमेळ्यात लाखो करोना चाचण्या केल्याच्या नोंदी बनावट असल्याचे एव्हाना उघड झाले आहे. मात्र, हे सगळे षडयंत्र लोकांसमोर आणण्यास कारणीभूत आहे तो पंजाबमधील फरिदकोट येथील विपन मित्तल हा एलआयसी एजंट. त्याने चिकाटीने पाठपुरावा केल्यामुळे उत्तराखंड सरकारचा हा सगळा बनाव उघडकीस आलेला आहे. त्याची ही कहाणी…
विपन मित्तल यांच्या मोबाईलवर करोना चाचणी रिपोर्टची एक लिंक असणारा एसएमएस आला. गंमत अशी होती की, मित्तल यांनी करोना चाचणीसाठी स्वॅब दिलेलाच नव्हता. त्यांना अशी शंका आली की, आपली वैयक्तिक माहिती कुणीतरी चोरली असावी आणि त्याचा गैरवापर करण्यात आलेला असावा. मग त्यांनी या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आणि त्यातून करोनाच्या बनावट चाचण्यांचा देशातील सर्वात मोठा घोटाळा उघडकीस आला.
ते म्हणतात, माझा कोविड-19 चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे सांगण्यात आले असले तरी माझी कुठलीही चाचणीच झालेली नव्हती. त्यामुळे मी जिल्हा प्रशासनाकडे गेलो. तिथे माझी बोळवण करण्यात आली. मग मी आरोग्य खात्याकडे गेलो. त्यांनाही सत्य शोधून काढण्यास रस नव्हता. शेवटचा पर्या म्हणून मी इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेकडे ई-मेलद्वारे तक्रार नोंदवली.
त्यांनी मात्र, या प्रकरणी तपास केला जाईल असे मला कळवले. परंतु, आठवडा झाली तरी त्यांच्याकडून कोणतीही माहिती मिळाली नाही तेव्हा मित्तल यांनी माहिती अधिकारात (आरटीआय) अर्ज दाखल केला आणि त्यांची कथित चाचणी केलेल्या लॅबोरेटरीचे तपशिल मागितले. आयसीएमआरने याचा शोध घेतला तेव्हा मित्तल यांचा स्वॅब हरिद्वारमध्ये घेण्यात आल्याचे आणि तिथेच त्यांची करोना चाचणी
करण्यात आल्याचे समजले. त्यानंतर आयसीएमआरने मित्तल यांची तक्रार उत्तराखंडच्या आरोग्य खात्याकडे फॉरवर्ड केली.
यासंदर्भातील 1600 पानांचा तपशिलवार चौकशी अहवाल तयार झालेला आहे. त्यातील माहितीनुसार करोनाची बनावट चाचणी करण्यात आलेले मित्तल हे एकमेव नसून त्यांच्याव्यतिरिक्त एक लाखांपेक्षा जास्त जणांच्या बनावट चाचण्या करण्यात आलेल्या असून त्यामागे हरियानातील एका संस्थेचा हात आहे.
हरिद्वारमध्ये कुंभमेळ्याच्या काळात रोज किमान 50,000 लोकांची करोना चाचणी करण्यात यावी असा आदेश उत्तराखंड उच्च न्यायालयाने दिल्यानंतर एक एप्रिल ते 30 एप्रिल या कालावधीत बनावट चाचण्यांचा घोटाळा करण्यात आलेला आहे. केवळ न्यायालयाने आदेश दिला आहे म्हणून कागदोपत्री या चाचण्या करण्यात आल्या.
त्यातील अनेक नावे आणि पत्ते अस्तित्वात नाहीत. जे पत्ते खरे असल्याचे आढळून आले त्यातील अनेक विद्यार्थी आणि नागरिक राजस्थानातील होते. ते कधीच कुंभमेळ्याला आले नव्हते. त्यांचे सॅम्पल कलेक्ट करून ते निगेटिव्ह असल्याचे दाखवण्यात आले होते. कुंभमेळ्याच्या काळात उत्तराखंड सरकारने एकूण चार लाख लोकांची करोना चाचणी केली.
त्यासाठी स्वॅब कलेक्ट करण्यासाठी आठ खासगी संस्थांची नेमणूक करण्यात आली होती. त्यातील एका संस्थेचे प्रताप उघड झाल्यानंतर बाकीच्या सात संस्थांचीही चौकशी करण्यात येत आहे. मित्तल, मी तक्रार केल्यानंतर यासंदर्भातील एवढा मोठा घोटाळा झालेला असेल असे मला वाटले नव्हते. आता सगळे फोकस करोना चाचण्यांच्या गैरव्यवहारावर असला तरी माझी माहिती कुणी आणि कशाप्रकारे चोरली आणि त्याचा गैरवापर केला याचा मी पाठपुरावा करणार आहे.
करोना चाचण्या करणाऱ्या हरियानातील संस्थेला माझी माहिती कशी मिळाली याचे उत्तर मला मिळाले पाहिजे. खोट्या चाचणी अहवालांबाबत उत्तराखंडच्या आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव आगरवाल यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, राज्याने पुढाकार घेऊन कंट्रोल रुमद्वारे सॅम्पल कलेक्शन करणाऱ्या संस्थांना प्राथमिक चौकशीसाठी बोलवले आहे. किती बनावट चाचण्या करण्यात आल्या आहेत याचा नेमका आकडा चौकशीनंतरच मिळेल.
तज्ज्ञांच्या मते करोना चाचण्यांसदर्भातील हा देशातील सगळ्यात मोठा गैरव्यवहार आहे. त्यामुळेच हरिद्वारमधील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांच्या संख्येबाबत संशय निर्माण होतो. उत्तराखंडमधील कोविड-19 परिस्थितीवर जवळून लक्ष ठेवणाऱ्या सोशल डेव्हलपमेंट फॉर कम्युनिटीज फौंडेशन या संस्थेचे सदस्य अनुप नौटियाल म्हणतात, कुंभमेळ्याच्या कालावधीत हरिद्वारमधील करोना पॉझिटिव्ह सापडण्याचा वेग अतिशय कमी होता आणि त्यामुळेच या सगळ्यांबाबत प्रश्न निर्माण होतात.
एप्रिल महिन्यात हरिद्वार जिल्ह्याचा करोन पॉझिटिव्हिटी रेट हा सरासरी 2.8 एवढा होता. त्याचवेळी राज्यातील अन्य 12 जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट हा सरासरी 14.2 टक्के एवढा होता.