राज्यातील टाळेबंदी उठली आणि पुन्हा एकदा नागरिक निर्ढावले. आता जणू काही कोरोना कायमचा गेला, अशा बेफिकीरीत नागरिक असून कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवले जात असल्याचे चित्र चंद्रपुरात बघायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर जनविकास सेना या संघटनेने अनोखी गांधीगिरी सुरू केली.
कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी शारीरिक अंतर आणि मास्क या दोन उपायांचे काटेकोर पालन करावे, यासाठी जनविकास सेनेने गर्दीच्या गोलबाजार परिसरात गांधीगिरी केली. ज्यांच्या तोंडावर मास्क नाही, अशा लोकांना गुलाबाचे फुल आणि मास्क वितरित केले. कोरोनामुळे झालेली जीवहानी यापुढे होऊ नये, यादृष्टीने लोकांत जनजागृतीचा हा प्रयत्न होता.लोकांना त्यांची चूक सविनय दाखवून देण्याचा हा उपक्रम शहराच्या विविध भागात राबवला जाणार आहे. लोकांनी कोरोनाचे नियम काटेकोर पाळल्यास तिसऱ्या लाटेला थोपवणे शक्य होऊ शकते, असा संदेश या गांधीगिरीतून देण्यात येत आहे.