पत्रकार आणि मित्र' व 'पल्लवी फाऊंडेशन' या दोन संस्थांच्या वतीने मुंबई, रत्नागिरी आणि कणकवली येथे 800 कलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.



प्रेस मीडिया वृत्तसेवा : 

 शिवसेना चित्रपट सेनेतर्फे लोककलावंतांच्या धान्य पुरवठय़ासाठी एक लाखांची मदत देण्यात येईल, अशी घोषणा चित्रपट सेनेचे अध्यक्ष, शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी केली. 'पत्रकार आणि मित्र' व 'पल्लवी फाऊंडेशन' या दोन संस्थांच्या वतीने आणि अहिल्या विद्या मंदिर 1981 बॅच माजी विद्यार्थी यांच्या सहयोगाने राज्यभरातील तब्बल दहा हजार लोककलावंतांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जाणार. पहिल्या टप्प्यात मुंबई, रत्नागिरी आणि कणकवली येथे 800 कलावंतांना वाटप करण्यात आले. मुंबईतील कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, आदेश बांदेकर, कवी महेश केळुसकर, अभिनेते दिगंबर नाईक, सुशांत शेलार आणि नृत्यांगना वर्षा संगमनेरकर उपस्थित होते.शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी या समाजोपयोगी उपक्रमाचे कौतुक तर केलेच, पण संस्थेने लोककलावंतांची सर्व माहिती गोळा करावी, त्यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडण्यासाठी निश्चितच प्रयत्न करू असे आश्वासन दिले. यावेळी दिगंबर नाईक, सुशांत शेलार, वर्षा संगमनेरकर यांनीही शुभेच्छा दिल्या. मुंबईतील शाहिरी कलापथक, तमाशा आणि दशावतारी कलावंतांना यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. पल्लवी फाऊंडेशनचे भाऊ कोरगावकर यांनी आभार मानले, तर शुभांगी मेमाणे यांनी सूत्रसंचालन केले.

लोककलावंत जगायला हवा!

या उपक्रमाचे कौतुक करताना प्रशांत दामले म्हणाले, लोककलावंत जगणे आवश्यक आहे. कोणी मदत मागितल्यानंतर मदत करणे वेगळे आणि स्वतःहून मदत करणे वेगळे. यासाठी सामाजिक जाणीव असावी लागते. नाटय़गृहे बंद असल्यामुळे फक्त कलावंतच नव्हे, तर रंगमंच कामगारांचाही रोजगार बंद झाला आहे. निर्बंध थोडय़ाफार प्रमाणात उठले असले तरी कोणताही निर्माता आज नवीन नाटक रंगभूमीवर आणण्याचे धाडस करत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे हे गाऱहाणे मांडले असून येत्या 15 दिवसांत ते योग्य निर्णय घेतील, असा विश्वास दामले यांनी व्यक्त केला.

लोककलावंतांना कर्जमाफी हवी

तमाशाचे फड चालवणारे किंवा दशावतारी मंडळे यांच्या मालकांनी व्यवसायासाठी कर्ज काढले आहे. मात्र दोन वर्षे त्यांचे उत्पन्नच बंद असल्याने ते अडचणीत आले आहेत. अशा लोककलावंतांना राज्य सरकारने शेतकऱ्यांप्रमाणेच कर्जमाफीची योजना द्यावी, अशी मागणी कवी आणि 'दशावतारा'चे अभ्यासक डॉ. महेश केळुसकर यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post