हातकणंगले तालुका प्रतिनिधी : आप्पासाहेब भोसले :
सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्यात मोठ्या चुरशीने मतदान झाले. सकाळी अकरापर्यंत केवळ १३ टक्के मतदान झाले होते. तर दुपारी एक वाजता मतदानाचा आकडा ९३ टकक्यांवर पोहचला होता. यावेळी एकूण ९५ मतदारांपैकी ८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दोन वाजताच पूर्ण १०० टक्के मतदान पूर्ण झाले.
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी हातकणंगले तालुक्याचे मतदान केंद्र येथील डांगे महाविद्यालयामध्ये ठेवण्यात आले आहे. केवळ ९५ मतदान असल्याने या ठिकाणी दोन मतदान केंद्रावर हे मतदान घेण्यात आले. सकाळी आठ वाजता मतदानाला सुरुवात झाली.आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, जि.प. सदस्य राहूल आवाडे यांनी सकाळच्या सत्रांत मतदान केंद्रावर हजेरी लावली. सकाळी अकरा वाजेपर्यंत मतदानाला फारसा वेग नव्हता. अकरा वाजेपर्यंत केवळ बारा जणांनी मतदान केले होते.
मात्र ११ च्या सुमारास मा. आमदार अमल महाडिक 'आमचं गोकुळ चांगलं चाललयं' असे छापलेली पांढरी टोपी घातलेल्या सत्तारूढ गटाच्या सत्तरहून अधिक मतदारांसह दाखल झाले. तर पिवळे स्कार्फ घातलेले विरोधी आघाडीचे कार्यकर्तेही तेथेच असल्याने घोषणाबाजी झाली. या सर्व मतदारांनी एकाच वेळी मतदान केल्याने एक वाजेपर्यंत मतदानाचा आकडा ८९ वर गेला. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शौमिका महाडीक यांनीही मतदान केंद्रावर हजेरी लावली.
यावेळी पोलिस निरीक्षक साहिल झरकर, पो. उप. नि. यशवंत उपराटे सपोनि. खान यांच्या मार्गदर्शनांखाली मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. दरम्यान तालुक्यात पॅनल टू पॅनल किती मते मिळणार, कुणाची सरशी होणार याची गणिते मांडण्यात कार्यकर्ते व्यस्त होते. निवडणुकीसाठी क्षेत्रीय आधिकारी म्हणून तहसिलदार प्रदिप उबाळे यांनी काम पाहिले.