पुणे - सहकारी बॅंकिंग विश्वात आपला वेगळा ठसा उमटवलेल्या जनता सहकारी बॅंक लि. पुणे या मल्टिस्टेट शेड्युल्ड बॅंकेने छोटे हॉटेल व्यावसायिक, केटरर्स, लंच होम, खानावळ चालक आदींसाठी जनता उपहारगृह कर्ज योजना तयार केली आहे. करोना महामारी आणि त्याबरोबर आलेल्या विविध निर्बंधामुळे हॉटेल व्यवसाय अडचणीत सापडला आहे. या व्यावसायिकांना आर्थिक मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने ही योजना आखण्यात आली आहे, असे बॅंकेचे संचालक आणि हॉटेल व्यावसायिक अमित शिंदे यांनी आज येथे सांगितले.
जनता उपहारगृह कर्ज योजनेची सविस्तर माहिती सांगताना शिंदे म्हणाले, या कर्ज योजनेद्वारे हॉटेल व्यावसायिकांना किमान रुपये 50 हजार (पन्नास हजार) ते कमाल रुपये 25 लाखांचे (पंचवीस लाख) कर्ज उपलब्ध करून दिले जाणार आहे. कर्जाच्या परतफेडीचा कालावधी 36 महिने राहणार आहे. (6 महिने ड्राय पिरियडसह) कर्ज रकमेनुसार विशिष्ट तारण घेतले जाणार आहे.
कर्जाचा व्याजदर हा फक्त 10 टक्के (दहा टक्के) राहणार असून या कर्जाची परतफेड दैनंदिन, साप्ताहिक आणि मासिक स्वरूपात करायची आहे. जनता उपहार गृह कर्ज योजनेची सविस्तर माहिती बॅंकेच्या महाराष्ट्र व गुजरात मधील 71 शाखांमध्ये उपलब्ध असून हॉटेल व्यावसायिकांनी आपल्या नजीकच्या शाखेत त्वरित संपर्क साधावा असे शिंदे यांनी सांगितले.