जमीन मालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून त्या आधारे खरेदीखत करून देऊन नागरिकाची तब्बल १३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर ,याप्रकरणी पिट्या आणि त्यांच्या ७ साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.



पुणे :  विधवा महिलेच्या जागेचा ताबा घेतल्याचा गुन्हा वानवडी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा आणखी एक गुन्हा मेहबुब शेख ऊर्फ पिट्याभाई यांच्यावर दाखल झाला आहे.

जमीन मालकाच्या नावाने बनावट व्यक्ती उभी करून त्या आधारे खरेदीखत करून देऊन नागरिकाची तब्बल १३ लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिट्या आणि त्यांच्या ७ साथीदारांवर हा गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी मेहबुब अब्दुलगफार शेख, आसिफ गुलाब शेख, आझर बशिर शेख, सज्जाद मौलाना, आयुब बशिर शेख, आरिफ नईमुल्ला शेख आणि अशफाक मोहम्मद रफिक शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत फईम चंद शेख (वय ४४, रा. सय्यदनगर, हडपसर) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींवर फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, बनावट कागदपत्रे उपयोगात आणणे त्यासाठी कट रचणे, चोरी करणे, संगनमत करणे, तसेच धमकावल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले की हडपसर-हांडेवाडी रोड येथे सर्व्हे नंबर ६३/१अ/२ ही जागा फिर्यादींना विकण्यासाठी आरोपींनी संगनमत केले. जागेचे मूळ मालक हे प्रशांत जिवराज पटेल आहेत, हे माहिती असताना त्यांच्या नावाने आरोपींनी बनावट व्यक्ती उभी करून कट रचून अशफाक मोहम्मद रफिक शेख या संशयीत आरोपीच्या नावाने बनावट खरेदीखत तयार केले. संबंधीत जागा फिर्यादीला विसारपावती व नोटराईज करून देवून फिर्यादीकडून त्या जागेसाठी तब्बल १३ लाख रुपये घेतले.

दरम्यान, फिर्यादींनी जेव्हा जागेवर बांधकाम करण्यास घेतले तेव्हा फिर्यादीच्या परवानगीशिवाय बांधकाम साहित्य चोरून नेले. हा प्रकार जानेवारी २०२० मध्ये घडला. दरम्यान, फिर्यादी यांनी वारंवार आरोपींकडे जागेबाबत पाठपुरावा केला असता त्यांना जागाही मिळाली नाही आणि पैसेही मिळाले नाही. उलट त्यांना धमकाविण्यात आल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post