पुणे पोलिसांकडून पहिल्यांदाच पोलिसांच्या बदल्यांसाठी खास 'सर्वसाधारण बदली व्यवस्थापन व्यवस्था (जीटीएनएस)' ही खास संगणक प्रणाली तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या बदल्यांमध्ये पारदर्शकता येण्याबरोबरच पोलिस ठाण्यांमधील उपलब्ध मनुष्यबळ, त्यांची तांत्रिक गरज या सगळ्यांचा विचार 'जीटीएनएस'मध्ये केला जाणार आहे.पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलिसांच्या बदल्यांसाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्यानुसार, पुणे पोलिस प्रशासन विभागाकडून मागील काही दिवसांपासून सॉफ्टवेअर निमितीकडे लक्ष देण्यात आले होते. एका कंपनीच्या मदतीने 'जीटीएनएस'ची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामध्ये पुणे पोलिस दलातील आठ ते नऊ हजार पोलिसांची इत्यंभुत माहितीही अपलोड करण्यात आली आहे.
पोलिसांना संबंधीत सॉफ्टवेअरद्वारे अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी त्यांना पाच पर्यायही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पोलिसांचे नाव, वय, बक्कल क्रमांक, परिमंडळ या उल्लेखाबरोबरच कर्मचाऱ्यांचा पोलिस ठाण्यातील कालावधी, परिमंडळामधील कालावधी, त्यांनी केलेले इतर कामे, पोलिसांचे कामाचे स्वरुप, त्यांची पदे या सगळ्याची नोंद या सॉफ्टवेअरमध्ये करण्यात आली आहे.