पुणे : दिवस असो किंवा रात्र नाकाबंदीदरम्यान तो तीन पायांवर उभा राहून पोलिसांसोबत कायम दक्ष असतो. परिसरातील आजूबाजूला त्याचे बारीक लक्ष असते. होय अशाच एका कुत्र्याचा पुणे पोलिसांच्या बालगंधर्व चौकीतील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना लळा लागला आहे. मागील काही महिन्यांपासून ट्राय पॉड (तीन पायावर) अर्थात राजा पोलिसांच्या दिमतीला कायम आहे. सध्या कोरोना कालावधीतही नाकाबंदी दरम्यान राजा दिवसरात्र पोलिसां सोबत असल्याचे दिसून आले आहे.
पाळीव प्राण्याला जीव लावल्यानंतर तो कायमस्वरूपी आपलासा होतो. अशाच प्रकारे मागील लॉकडाउनमध्ये बालगंधर्व चौकीजवळ एक तीन पायाचे कुत्र्याचे पिल्लू भटकत आले होते.त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला बिस्कीट खाऊ घातले होते. त्यानंतर पिल्लू दररोज चौकीजवळ येऊ लागल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याचे 'राजा' असे नामकरण केले. कर्मचाऱ्यांकडून दररोज डब्यातील भाकरी, बिस्कीट असे पदार्थ राजाला नित्यनियमाने खाऊ घातले जात आहेत. त्यामुळे राजाकडूनही इमानइतबारे नाकाबंदीत उभे राहून उपकराची परतफेड केली जात आहे. नाकाबंदीत राजा पोलिसांसोबत कायम उभा असतो. तीन पायावर उभे राहून परिसरात कटाक्ष टाकणे हा त्याचा नित्यक्रम झाला आहे.
नाकाबंदीदरम्यान तीन पायावर उभे राहून राजा पोलिसांसोबत काम करीत असल्याचे पाहून हदयस्पर्शी भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडूनही त्याच्या खाद्यपदार्थांची काळजी घेतली जात आहे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ट्विटरद्वारे राजाबद्दलचे आपल्या मनातील भाव व्यक्त केले आहेत.
बंदोबस्ताकरिता कायम तत्पर
बालगंधर्व चौकीजवळ मागील लॉकडाऊनपासून तीन पायाचे कुत्र्याचे पिल्लू (राजा) कायम येत आहे. चौकीच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या प्रेमामुळे त्याला लळा लागला आहे. त्यामुळे दिवसरात्र बंदोबस्त आणि नाकाबंदीवेळी राजा कायम आमच्यासोबत उभा असतो.
मुरलीधर करपे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, डेक्कन पोलीस ठाणे