मिरज-सांगली रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित वृद्धेचा मृत्यू झाला. बिल भरल्याशिवाय मृतदेह देणार नाही, असा पवित्रा घेत रुग्णालय प्रशासनाने बिलासाठी वृद्धेच्या नातेवाईकांची अडवणूक केली. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. रविवारी दुपारी हा प्रकार घडला. अखेर मध्यस्थीनंतर रुग्णालयाने नातेवाईकांकडे मृतदेह सुपूर्द केला.
चार दिवसांपूर्वी पंढरपूर (जि. सोलापूर) येथील एकाच कुटुंबातील तिघांना उपचारासाठी सांगली - मिरज रस्त्यावरील एका कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना यापैकी वृद्धेचा मृत्यू झाला.परंतु, रविवारी सकाळपर्यंत रुग्णालयाने मृतदेह नातेवाईकांकडे दिला नव्हता. वृद्धेवरील उपचाराचे अडीच लाख रुपये बिल भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास रुग्णालयाने नकार दिल्याचे मृत महिलेच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दरम्यान पैसे भरल्याशिवाय मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालयाची तोडफोड केली. अखेर आमदार गोपीचंद पडळकर यांनी मध्यस्थी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. परंतु, याबाबत रुग्णालय किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली नसल्याचे सांगण्यात आहे. या प्रकारानंतर घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता