कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर . 25 मेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार. 1 जुलैला मतमोजणी होणार



सातारा व सांगली जिल्ह्यातील पाच तालुका कार्यक्षेत्र असलेल्या रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम आज जाहीर झाला आहे. 25 मेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. 29 जून रोजी मतदान होणार असून, 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कृष्णा कारखान्याची निवडणूक होणार की नाही? असा प्रश्न होता. कृष्णा कारखानाच्या निवडणुकीबाबत 10 फेब्रुवारी 2021 रोजी न्यायालयाने आदेश पारित केले असून, सदर याचिकेमध्ये उच्च न्यायालयाने य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले होते.आज निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टीकर यांनी कृष्णा कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने निवडणुकीच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य इमारतीच्या सभागृहात निवडणूक कार्यालय करण्यात आले आहे. तेथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे यांनी य. मो. कृष्णा कारखान्यांची निवडणूक प्रक्रिया चालू केली आहे. 'कृष्णा'ची अंतिम मतदार यादी 6 मे 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सातारा जिल्ह्यातील कराड, सांगली जिल्ह्यातील वाळवा, कडेगाव, खानापूर, पलूस या पाच तालुक्यांमध्ये कृष्णा कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. अंतिम मतदार यादीनुसार कारखान्याचे 47 हजार 160 सभासद मतदार आहेत. कारखान्याच्या निवडणुकीसाठी सहा गट करण्यात आले आहेत. यात वडगाव हवेली - दुशेरे गट 3, काले - कार्वे गट 3, नेर्ले - तांबवे गट 3, रेठरे हरणाक्ष - बोरगाव गट 3, येडेमच्छिंद्र - वांगी गट 2, रेठरे - शेणोली गट 2 असे सहा गट आहेत. त्यातून 16 उमेदवार निवडले जाणार आहेत. तर राखीव गटात अनुसूचित जाती-जमाती 1, महिला राखीव 2, इतर मागास प्रवर्ग 1, विमुक्त जाती-भटक्या जमाती 1 असे 5 एकूण 21 उमेदवार निवडून द्यायचे आहेत.

उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेशित केलेल्या सहकारी संस्था वगळून, राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका शासन आदेशाच्या दिनांकापासून ज्या टप्प्यावर असतील, त्या टप्प्यावर 31 ऑगस्ट 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कारखाना कार्यक्षेत्रात कोरोना संसर्गजन्य रोगाच्या साथीच्या अनुषंगाने शासनाच्या आदेशाचे पालन करून व सामाजिक अंतर राखून आणि साथरोग अधिनियमाचे पालन करावे. - प्रकाश अष्टीकर, निवडणूक निर्णय अधिकारी.

असा आहे निवडणूक कार्यक्रम

कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीसाठी मंगळवारी 25 मेपासून 1 जूनपर्यंत उमेदवारी अर्ज कराड येथे दाखल करावयाचे आहेत. उमेदवारी दाखल अर्जांची छाननी 2 जूनला सकाळी 11 वाजेपासून निवडणूक निर्णय अधिकाऱयांच्या कार्यालयात सुरू होणार आहे. उमेदवार अर्ज माघारीची मुदत 3 जून ते 17 जूनपर्यंत सकाळी 11 ते 3 यावेळेत आहे. 18 जूनला निवडणूक लढविणाऱया उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. याच दिवशी चिन्हवाटप होणार आहे, तर 29 जूनला सकाळी आठ ते दुपारी पाच या वेळेत मतदान होणार आहे. त्यानंतर 1 जुलैला मतमोजणी होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post