दत्तवाड : पृथ्वीसिंग राजपूत :
दत्तवाड :- येथील दूधगंगा नदीत मगरीच्या हल्ल्यात घोड्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली . दत्तवाड येथील अनिल रामू शिरढोणे हे आपली दोन्ही घोडे घेऊन पाणी पाजण्यासाठी नदीवर गेले होते . नदीमध्ये असणाऱ्या मगरीने त्यांच्या एका घोड्यावर हल्ला करून पाण्यात ओढून नेले . त्या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनी आरडाओरड केला . परंतु , मगर त्या घोड्याला नदीपात्रात घेऊन गेली .
दूधगंगा नदीत मगरीची दहशत सुरू असून शेतकरी व नागरिकात भीतीचे वातावरण आहे . नदीमध्ये तीन ते चार मगरीचा वावर आहे . त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष देऊन मगरीचा बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे .
काही दिवसांपूर्वी दूधगंगा नदीमध्ये पाणी पिण्यास गेलेल्या म्हशीवर मगरीने हल्ला करून जखमी केले होते . दत्तवाड येथील नागरिक व शेतकऱ्यांना दिवसा व रात्रीच्या वेळी वारंवार मगरीचे दर्शन होते . दत्तवाड येथील नदी काठी अनेक शेतकऱ्यांनी शेतीसाठी पाणी उपसा मोटरी बसविलेले आहेत . त्यामुळे नदीकाठी शेतकऱ्यांची वर्दळ असते . रात्री - अपरात्री शेतकरी शेताला पाणी पाजण्यासाठी जात असतात . नदीच्या काठावर मगरीचे दर्शन होत असल्याने शेतकरी व ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत .