दत्तवाड : पृथ्वीसिंग राजपूत :
दत्तवाड :- दत्तवाड परिसरातील सुमारे ११ गावातील आरोग्य केंद्र सरकारी दवाखान्यांमध्ये गेल्या काही दिवसापासून गोळ्यांची कमतरता भासत होती . गेल्या काही दिवसापासून लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली आहे . लसीकरणानंतर नागरिकांना पॅरासिटामोल ५०० गोळी देण्यात येते . त्यामुळे लसीकरण केंद्रावर पॅरासिटामोल या गोळ्यांची कमतरता निर्माण झाली होती . याबाबत आरोग्य सेवकांचे सुपरवायझर कोळी यांचेमार्फत माहिती मिळताच दत्तवाड येथील माजी उपसरपंच व भाजप तालुका उपाध्यक्ष राजगोंडा पाटील यांनी ही सोशल मिडीयाच्या माध्यमातून लोकांना कळवली असता त्याला दोनच दिवसात चांगला प्रतिसाद मिळाला .
दत्तवाड येथील व सध्या कामानिमित्त परगावी असलेले शितल शिंदे (सध्या पलूस ) यांनी६००० गोळ्या , सुरेश धुमाळे ( सध्या मुंबई ) यांनी १०००० गोळ्या व निखिल भाटले ( सध्या मिरज ) यांनी २००० गोळ्या असे सुमारे १८ हजार गोळ्यांची उपलब्धता करून दिली . त्यामुळे आरोग्य केंद्रांमध्ये औषधांची कमतरता काही अंशी कमी झाली आहे . तरी सद्यस्थितीतील लसीकरण व औषधांचे महत्त्व लक्षात घेता प्रशासनाने त्वरित दत्तवाड परिसरातील प्राथमिक आरोग्य केंद्रे , ग्रामीण रुग्णालय तसेच लसीकरण केंद्रावर औषधांचा पुरवठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करावा , अशी मागणी नागरिकांमधून होत आहे .