पिंपरी चिंचवड : राज्यभरात सर्वत्र रेमेडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अनेक रुग्णांची, त्यांच्या नातेवाईकांची यामुळे तारांबळ उडाली आहे. मात्र या सगळ्या प्रकारात इंजेक्शनच्या काळाबाजारातही वाढ झाली आहे. पोलिसांनी अशाप्रकारे काळाबाजार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. पिंपरी चिंचवडमधून देखील अशीच एक बातमी समोर येते आहे. यामध्ये चक्क नगरसेविकेच्या मुलाला पोलिसांनी अटक केली आहे.कोरोनावरील उपचारादरम्यान रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा उपयोग केला जातो मात्र या इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा आहे. हेच इंजेक्शन काळा बाजारात खुलेआम दुप्पट-तिप्पट किंवा ठिकाणी त्याहीपेक्षा चढ्या दराने विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार उघडकीस आले .अशाच एका प्रकरणी पिंपरी शहरातील चिखली प्रभाग एकच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांच्या मुलाला पोलिसांनी अटक केल्याने पिंपरी-चिंचवड शहरात खळबळ उडाली आहे.
पुणे पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार केल्याप्रकरणी वेगवेगळ्या तीन गुन्ह्यात 5 जणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून 6 इंजेक्शन जप्त केले आहेत. याप्रकरणी खडकी, अलंकार आणि डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खडकी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात शुभम आरवडे आणि वैभव अंकुश मळेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. वैभव मळेकर हा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अपक्ष नगरसेविका साधना मळेकर यांचा मुलगा आहे डेक्कन पोलिस ठाण्यातील गुन्ह्यात राहुल खाडे आणि विजय पाटील या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून तीन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत. तर अलंकार पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात विष्णु गोपाळघरे याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती मिळते आहे.
या सर्व आरोपींनी रेमडेसिविर इंजेक्शन अवैधरित्या मिळवून ते स्वतःच्या ताब्यात बाळगले होते. तसेच स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी या इंजेक्शनची ते बेकायदेशीररित्या वैध किमतीपेक्षा जास्त किंमतीला विक्री करत असल्याचाही त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे डॉक्टरांचे कोणतेही प्रिस्क्रिप्शन नसतानाही या इंजेक्शनची ते विक्री करताना आढळून आले आहेत. या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे.