सूरत :- अगदी तुमची शंभरी ओलांडली असली तरी सकारात्मक विचार आणि इच्छाशक्तीच्या बळावर कोरोनासारख्या विषाणूला परतवून लावू शकतो, हे सूरत येथील 105 वर्षाच्या आजीने सिध्द करून दाखवले आहे. कोरोना माझ काही वाकड करू शकत नाही, असे म्हणत त्यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आजींच्या दृढ इच्छाशक्ती समोर कोरोनालाही गुडघे टेकावे लागले. दरम्यान लोक कोरोनाला घाबरून तब्येत जास्त खराब करून घेतात. मात्र या आजी कोरोनाचा सामना कसा करायचा याचे उत्तम उदाहरण असल्याचे डॉक्टर म्हणाले.
आजींसारखे तणावमुक्त होऊन उपचार घेतल्यास कोरोनाला सहज परतवून लावता येऊ शकते असे डॉक्टर म्हणाले.ऊजिबा गोंडलिया (वय 105) असे या आजीचे नाव आहे. आजींना कोरोनची लागण झाल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांना काहीशी काळजी वाटू लागली. पण आजी मात्र जराही घाबरल्या नव्हत्या. उलट त्या सर्व नातेवाईकांना धीर देत होत्या. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यावेळी रुग्णालयातील आरोग्य कर्मचारी आजींची इच्छाशक्ती पाहून आश्चर्यचकित झाले. आजी डॉक्टरांना म्हणाल्या की, मला काहीही होणार नाही. कोरोना माझ काही बिघडवू शकत नाही. मी लवकर बरी होऊन घरी जाईल असे त्या म्हणाल्या. अन् झालेही तसेच 9 दिवसांच्या उपचारानंतर आजीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आणि त्यांनी कोरोनावर मात केली. ऊजिबा यांचा मुलगा गोविंद म्हणाला की, आजींनी शेतीमध्ये नांगरणी, बैलगाडी चालवणे आदी कामे केली आहेत. कडाक्याची थंडी असो वा उन आजी कामाला मागे हटत नव्हत्या. अजूनही स्वतःची बहुतांश काम स्वतः करतात असे त्यांनी सांगितले. 97 व्या वर्षी पाठिचं हाड तुटल्यानं त्यांचे ऑपरेशन झालं होतं. पण तरीही आजींची प्रकृती उत्तम असल्याचे तो म्हणाला.